नाशिकः कोणाही सामान्य माणसाला चटका लावणारी अतिशय हृदद्रावक घटना नाशिकमध्ये घडलीय. आडगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नोकरीवर असणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक भागवत मोरे (वय 52) यांना जेवतानाच हृदविकाराचा झटका आला. त्यामुळे भरल्या ताटावरच त्यांची प्राणज्योत मालवली.
अशी घडली घटना
सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे हे ग्रामीण भागात कर्तव्यावर होते. ते धात्रक फाटा राऊत मळा येथे रहायचे. मागील तीस वर्षांपासून त्यांची नोकरी अतिशय सुरळीत सुरू होती. त्यादिवशीही ते नेहमीप्रमाणे नोकरीवर आले. त्यांची तब्येतही अतिशय ठणठणीत होती. दुपारी जेवणाची सुट्टी झाली. तेव्हा ते आपल्या धात्रक फाटा येथील राऊत मळ्यातील घरी जेवायला गेले. त्यांनी घरातल्यांना जेवायला वाढायला सांगितले. नेहमीप्रमाणे गप्पा-टप्पा करत जेवण सुरू केले. मात्र, अचानक त्यांच्या छातीत कळ आली. छाती दुखू लागली. श्वास घ्यायलाही त्रास सुरू झाला. त्यातच त्यांची शुद्ध हरपली.
रुग्णालयात मृत घोषित
मोरे यांचा त्रास होत असल्याचे पाहून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिथे तात्काळ उपचार सुरू केले. मात्र, मोरे यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबाला दिली. मोरे यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांना मृत्यूने जेवणाच्या ताटावर गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना त्यांच्या मृत्यूचा चटका बसला आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वारसाला देणार नोकरी
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मोरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. पोलीस खात्याकडून मिळणारे सर्व लाभ तातडीने देण्यात येतील. अनुकंपाद्वारे वारसाला शासकीय नोकरी देण्यात येईल. सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. ही सारी सुविधा मोरे कुटुंबाला तात्काळ मिळाव्यात याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचीही माहितीही त्यांनी दिली.
का येतो हृदयविकाराचा झटका?
खराब जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढला आहे. या प्रकारच्या समस्यांमुळे कोणत्याही वेळी हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. वास्तविक, रक्तामध्ये गाठीमुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात, म्हणजेच शरीराच्या इतर भागात रक्त संक्रमित करण्यासाठी जास्त दबाव निर्माण होतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंचा प्रसार होऊ लागतो आणि हृदयाचे आकार बदलू लागतो. हृदयविकाराच्या झटक्याचे हे एकमेव कारण आहे.