कमी कालावधीत गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवणाऱ्या अनेक योजना येत असतात. मग जास्त पैसे मिळण्याच्या लालसेमुळे अनेक जण त्यात गुंतवणूक करतात. त्या योजनांची खातरजमा करत नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार उघड होतो. एका योजनेत फसवणूक केल्यामुळे सात वर्ष शिक्षा झालेले आरोपी कारागृहातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुंतवणूक योजना सुरु केली. त्यातही कोट्यवधींची गुंतवणूक झाली. मग पुन्हा फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. चाळीस दिवसांत दाम दुपट्ट करून देण्याच्या आमिषला नाशिक जिल्ह्यासह चार राज्यांतील शेकडो गुंतवणूकदार बळी पडले. या प्रकणात ५० लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची पहिली तक्रार लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
लासलगाव येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड व गौरीशंकर या नावानेही संस्था आहेत. गेल्या नऊ-दहा वर्षांपूर्वी संस्था चालक सतीश काळे याने हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. त्या प्रकरणात सतीश काळे याला सहा ते सात वर्ष जेलमध्ये जावे लागले होते. मात्र पुन्हा बाहेर लासलगाव येथील स्टेशन रोडवर एका कॉम्प्लेक्समध्ये त्याने गुंतवणूक योजना सुरु केली. सतीश पोपट काळे याने योगेश काळे यांच्या नावावर स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि. (लॅन्ड, प्लॉट, कन्स्ट्रक्शन, शेअरट्रेडींग अॅन्ड गोल्ड इन्वेस्टमेंट) या फर्मची स्थापना केली.
चाळीस दिवसांत दाम दुप्पटाची आमिष दाखवत लासलगावसह चार राज्यांतील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा सतीश काळे आणि योगेश काळे यांनी घातला. लासलगाव पोलीस ठाण्यात याबाबत पहिली तक्रार दाखल झाली आहे. तक्रारदार सोमनाथ गांगुर्डे, दीपक परदेशी इतर काही गुंतवणूकदारांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांची ५० लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीत शेकडो महिला पुरुष गुंतवणूकदार एकत्र येत स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि. या फर्मचे संचालक योगेश काळे व या फर्ममध्ये लिपिक पदावर असलेला मुख्य सूत्रधार सतीश काळे याच्या विरोधात एकत्र आले. त्यांनी या दोघांचा शोध घेण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारही केली.