नाशिक : व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे गुरुवारी नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील किशोरवयीन मुलां-मुलीचे प्राण वाचवण्यात मदत झाली. एका 17 वर्षांच्या मुलाने आपले स्टेटस अपडेट करत गर्लफ्रेण्डसह आयुष्य संपवत असल्याचे लिहिले होते. हे अपडेट त्याच्या मित्रांनी पाहिले आणि त्यांनी प्रेमी युगुलाच्या बचावासाठी धाव घेतली. वेळीच मदत झाल्याने दोघांना वाचवण्यात यश आले. प्रेमी युगुलाने हॉटेलमध्ये कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
दोन्ही किशोरवयीन मुलांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल भादंविच्या कलम 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सध्या मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.
काय होते व्हॉट्सअॅप स्टेटस?
या जोडप्याने गुरुवारी दुपारी देवळा येथील हॉटेलच्या खोलीत कीटकनाशकाचे सेवन केले. त्या मुलाने नंतर त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून “गेलो” असे लिहिले होते.
नेमकं काय घडलं?
देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास भोज म्हणाले की, मुलाच्या काही मित्रांनी व्हॉट्सअॅप स्टेटस पाहिले. मुलगा आणि मुलगी कुठे असू शकतात हे त्यांना स्पष्टपणे माहित होते किंवा कदाचित कोणीतरी हॉटेलच्या आसपास जोडप्याला पाहिले होते. त्यामुळे काही मिनिटांतच मित्रांनी हॉटेलकडे धाव घेतली.
खोलीत शिरताच दिसलं भयंकर दृश्य
त्यांचे मित्र खोलीत शिरले तेव्हा प्रेमी युगुल बेशुद्धावस्थेत होते. त्यांना सुरुवातीला देवळा येथील रुग्णालयात आणि नंतर मालेगावच्या दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले.
पोलीस निरीक्षक भोज म्हणाले की, दोन्ही किशोरवयीन मुले वेगवेगळ्या जातींतील असल्याने त्यांच्या नात्याला भविष्य नसल्याची भीती त्यांना सतावत होती. परिणामी त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
हॉटेल चालकांवरही गुन्हा
दरम्यान, पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल भादंविच्या कलम 309 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत किशोरवयीन मुलांचे ओळखपत्र, वय इत्यादी तपासल्याशिवाय किंवा त्यांच्या नावाची नोंद हॉटेल रजिस्टरमध्ये न करता त्यांना खोली दिल्याबद्दल हॉटेल चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
65 वर्षांच्या आजीचा कुऱ्हाडीने वार करून नाशिकमध्ये खून; काम कर म्हटल्याने नातवाचा राग अनावर
मोठ्या जाऊबाईंच्या दागिन्यांचा मत्सर, धाकटीने भावासोबत प्लॅन आखला, कोट्यवधींच्या खजिन्यावर डल्ला
पुण्यात महिला लेफ्टनंट कर्नलची आत्महत्या, हिमाचलमधील ब्रिगेडियरवर गुन्हा