मनोहर शेवाळे, Tv9 मराठी, मालेगाव | 21 ऑक्टोबर 2023 : मालेगावातही कॅफेच्या नावाने अश्लीलता सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासातून समोर आला आहे. मालेगाव महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून आज 10 पेक्षा जास्त कॅफेवर संयुक्त धडाकेबाज छापेमारीची कारवाई करण्यात आली. या कारवाईतून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही नराधमांचा कॅफेच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू होता. पोलिसांच्या तपासातून हे धक्कादायक चित्र उघड झालंय. विशेष म्हणजे पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या कॅफेवर ही कारवाई केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.
नाशिकमध्ये आधी संबंधित प्रकार समोर आला होता. त्यानंतर मालेगावात कॅफेंवर कारवाई करण्याची मोहीत पोलीस आणि महापालिकेने सुरु केली. यावेळी अनेक हायप्रोफाईल परिसरात पोलिसांनी आणि महापालिकेच्या पथकांनी छापेमारी केली. यावेळी अनेक तरुण-तरुणी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचादेखील समावेश आहे. पोलिसांनी या सर्व तरुण आणि तरुणींचे समुपदेशन केलं आहे. पण या कारवाईतून समोर आलेल्या प्रकारामुळे शहरात एकच खळबल उडाली आहे.
नाशिकच्या सिन्नर येथे कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं. पोलिसांनी नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या काही कॅफेवर छापा टाकला. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. या कॅफेंमध्ये अश्लील आणि अवैध प्रकार सुरु होता.
नाशिक पाठोपाठ मालेगावातही कॅफेच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू असल्याचं मालेगाव पोलिसांच्या कारवाईवरून समोर आलं आहे. मालेगाव महापालिका आणि पोलीस यांनी देखील शहरातील कॅफेवर झाडाझडती घेतली असता अनेक ठिकाणी तरुण, तरुणी आढळून आले. पोलिसांनी तरुण, तरुणींचे समुपदेशन केले असले तरी नाशिक पाठोपाठ मालेगावातही कारवाईत धक्कादायक चित्र समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह मनपा प्रशासनाने ही कारवाई केली. शहरातील सर्व कॅफे हाऊसवर कारवाईची ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक भारती यांनी दिली.