नाशिकः नाशिमध्ये दिवसाढवळ्या चक्क पोलीस ठाण्याजवळून एका तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सुप्रसिद्ध अशा मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली. एकीकडे खुनामागून होणारे खून, चोरी आणि दरोड्याच्या वाढलेल्या घटना आता त्यात चक्क अपहरणाच्या प्रयत्नामुळे पोलीस करतायत काय, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
अशी घडली घटना?
नाशिकमध्ये सोमवारी मार्केड यार्ड परिसरातील पोलीस ठाण्याजवळ मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही तरुणी काकासोबत पायी जात होते. यावेळीआलेल्या दोन तरुणांनी सुरुवातीला तरुणीची छेड काढली. मात्र, तरुणीने विरोध केला. तेव्हा त्यांनी या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न केला.
काकाने केले दोन हात
मुलीच्या काकाने या अपहरणकर्त्या तरुणांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात तरुणीने जोरदार आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे जवळच असलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत या तरुणांना ताब्यात घेतले. मात्र, चक्क पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण पोलीस ठाणे परिसर सुरक्षित नसेल, तर नेमका कुठला भाग सुरक्षित मानायचा असा सवाल विचारला जात आहे.
गुन्हेगार मोकाट
नाशिकमध्ये गुन्हेगार अक्षरशः मोकाट सुटले आहेत. काही दिवसांपूर्वी एका भाजप पदाधिकाऱ्यास एकाच आठवड्यात तिघांचे खून झाले. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले. विधिमंडळ अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात खुनामागून खून झाले आणि दरोड्यामागून दरोडेही पडले. चोरी, लूटमार या घटनांही सुरूच आहेत. मग पोलीस करतायत काय, असा सवाल विचारला जात आहे.
हेल्मटसक्तीचाही फज्जा
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी काही दिवसांपासून फक्त हेल्मटसक्ती मोहिमेकडे लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या मोहिमेचाही फज्जा उडालाय. कारण स्वतः पोलिसच नियमांचे पालन करत नाहीत, तर नागरिक काय करतील, असा सवाल विचारला जात आहे. एका पेट्रोलपंपावर तर विनाहेल्मेट आलेल्या पोलिसावर नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा संबंधितांना काढता पाय घ्यावा लागला होता. आता पोलिसांनी निदान मोकाट गुन्हेगारांना वेसण घालावी, अशी मागणी होत आहे.
Nashik Accident| सेल्फी हजेरीची धावपळ कर्मचाऱ्याच्या जीवावर; दुसऱ्या घटनेत सायकलपटूला उडवले!
Medical Exam| कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कधीपासून होणार पेपर?