नाशिकः नाशिकची क्राईमनगरीकडे अतिशय वेगाने होणारी वाटचाल भीतीदायक आहे. सध्या रम्य, निसर्गाच्या कुशीत वसलेले शहर पुढे चालून कसे असेल, याची शक्यता वर्तवण्यानेही थरकाप उडतो. कारण खून, दरोडे आणि लुटालूट सध्या तरी थांबताना दिसत नाहीय. आता पुन्हा एकदा एका चार जणांच्या टोळक्याने मेरी गाडी को कट क्यों मारा म्हणत तब्बल 5 लाखांची वाटमारी केली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिकमधील अशोका मार्ग भाग हा उच्चभ्रूंची वसाहत समजला जातो. येथे ही घटना घडली आहे. दुचाकीला कट का मारला, असे म्हणत दोघांनी लुटीचा बेत आखल्याचे समोर आले आहे. त्याचे झाले असे की, धीरज हिरण (रा. हॅप्पी होम कॉलनी, अशोका मार्ग) हे अशोका मार्ग येथून कारने (एम.एच. 15 एचके 7608) चालले होते. तेव्हा दोन संशयितांनी पाठीमागून दुचाकीवरून येत त्यांची कार थांबवली. मेरी गाडी को कट क्यों मारा, म्हणत त्यांना अतिशय असभ्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. मारहाण केली. इतकेच नाही, तर त्यांनी फोन करून आणखी दोघांना बोलावून घेतले. ते आल्यानंतर संशयितांनी कारची तोडफोड केली. कारच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली पाच लाखांची रक्कम आणि कागदपत्रे चोरू नेली. याप्रकरणी धीरज हिरण यांच्या तक्रारीवरून राहुल, अमिर आणि इतर दोघांवर अशोकामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
कधी थांबणार हे सगळं?
नाशिकमध्ये एका उद्योजकाला दोन कोटींच्या खंडणीसाठी मोक्काखाली अटकेत असलेला भूमाफिया रम्मी राजपूतने सूत्रे हलवल्याचे समजते. त्याच दिवशी एका नागरिकाला भर रस्त्यात लुटण्यात आले. दुसरीकडे गेल्या महिन्यात तीन दरोडे पडले. शिवाय एकाच आठवड्यात लागोपाठ तीन खून झाले. मृतात सातपूर येथील भाजप मंडळाध्यक्षाचा समावेश होता. या साऱ्या प्रकरणांमुळे नाशिककरांमध्ये प्रचंड धास्ती आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या तातडीने मुसक्या आवळाव्यात. नाशिकमध्ये प्रचंड वेगाने वाढणाऱ्या गुन्हेगारीला वेसण घालावी, अशी मागणी होताना दिसतेय.