येवला (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना ही येवल्याच्या एरंडगाव बुद्रुक येथे घडली आहे. संबंधित घटना रविवारी (5 सप्टेंबर) संध्याकाळी उघडकीस आली होती. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मृतक मुलांच्या वडिलांचं संतोष जगताप असं नाव आहे. ते कुटुंबासह एरंडगाव बुद्रुक येथे राहतात. त्यांना हर्षल (वय 13) आणि शिवा (वय 11) अशी दोन मुलं होती. संतोष रविवारी (5 सप्टेंबर) दुपारी काही कामानिमित्ताने पत्नीसह बाहेर गेले होते. यावेळी घरात हर्षल आणि शिवा होते. दोघे भावंड दुपारनंतर शेतात फिरायला गेली. यावेळी एक विपरीत घटना घडली.
शेतातली शेततळ्याची गंमत बघत असताना शिवा याचा पाय घसरला आणि तो थेट शेततळ्यात पडला. यावेळी त्याचा मोठा भाऊ हर्षलचा जीवाचा आटापिटा होऊ लागला. त्याने आजूबाजू बघितलं. मदतीसाठी कुणीही नाही हे समजल्यानंतर हर्षलने देखील मागचा-पुढचा कोणताही वितार न करता भावाला वाचवण्यासाठी थेट पाण्यात उडी मारली. पण पोहता येत नसल्याने दोघी भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.
दुसरीकडे मुलांचे वडील संतोष आणि त्यांच्या पत्नी संध्याकाळी घरी आले तेव्हा त्यांना घरात आणि घराबाहेर मुलं दिसली नाहीत. त्यांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलांची आई त्यांच्या मित्रांच्या घरी बघून आली. तर वडील गावात ठिकठिकाणी बघून आले. पण मुलांचा तपास लागला नाही. अखेर मुलं कदाचित शेतात गेली असतील या विचाराने त्यांनी शेताचा रस्ता धरला. त्यानंतर शेततळ्यात दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले.
या भयानक घटनेवर कसं व्यक्त व्हावं ते वडील संतोष यांना समजत नव्हतं. त्यांनी जीवांच्या आकांताने आक्रोश केला. यावेळी गावातील इतर नागरिकांनी संतोष यांना सावरण्याचा प्रयत्न केला. पोटच्या दोन्ही मुलांचे मृतदेह बघून त्यांच्या आईनेही प्रचंड आक्रोश केला. यावेळी गावातली नागरिकांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं.
दरम्यान, रविवारी रायगडच्या जिल्ह्यातील काशिद बीचवर एक अनपेक्षित घटना घडली होती. एक तरुण आपल्या मित्रांसोबत काशिद बीचवर फिरण्यासाठी आला होता. यावेळी तो पोहोण्यासाठी समुद्रात उतरला. पण पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. गौरव सिंग यादव असं 28 वर्षीय मृतक तरुणाचं नाव होतं. तो मुळचा उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर इथला रहिवासी होता. तो सध्या कामानिमित्ताने खोपोलीत राहत होता. दरम्यान, रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने तो मित्रांसोबत आज घराबाहेर पडला. काशिद बीचवर फिरण्यासाठी आला. तो पोहोण्यासाठी समुद्रात गेला. पण तिथून परत आलाच नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी अंत झाला.
हेही वाचा :
डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या, पुण्याच्या चाकणमध्ये एकच खळबळ, हत्येमागे नेमकं कारण काय?