नाशिकः सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांचा कित्ता गिरवत नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून हजारोंचा जमाव जमवत कोरोना प्रतिबंधक नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आता याप्रकरणी प्रशासनाने आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बैलगाडा शर्यतप्रकरणी दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. मात्र, एकीकडे जगभरात ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. त्यात हे प्रकार असेच सुरू राहिले, तर होणार कसे असा सवाल उपस्थित होत आहे.
नियम काय आहे?
राज्य सरकारने राज्यात कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. त्यानुसार कुठल्याही कार्यक्रमाला 250 लोकांपेक्षा जास्त जणांचा जमाव जमवू शकत नाही. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. मात्र, बैलगाडा शर्यतीत हा नियम धाब्यावर बसवणे सुरू आहे.
अशी झाली शर्यत
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर शिवारात पुन्हा विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे समोर आले आहे. या शर्यतीलाही हजारो जणांची उपस्थिती होती. शेकडो स्पर्धक सहभागी झाले. मात्र, याची प्रशासनाला भणकही नव्हती. जेव्हा ही बाब समोर आली, तेव्हा आयोजक रवींद्र पवारसह इतर आठ जणांविरोधात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बी. आर. नरवडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, केवळ गुन्हा दाखल करून प्रश्न सुटत नाही, याचा विचार प्रशासन करणार का, असा सवाल सुज्ञ नागरिक करत आहेत.
पहिला गुन्हाही नाशिकमध्येच
सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठल्यानंतर यापूर्वी शनिवारीही नाशिकमधल्या ओझरमध्ये राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत रंगली. मात्र, या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाची कसलिही परवानगी घेण्यात आली नव्हती. हजारो नागरिकांचा जमाव यावेळी जमला होता. राज्यभरातील शेकडो स्पर्धक उपस्थित होते. त्यामुळे येथे अलोट गर्दी होती. मास्क आणि सुरक्षित अंतराबद्दल न बोललेच बरे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत अशी निर्बंधाची आणि नियमांची पायमल्ली करत पार पडली. याप्रकरणी राज्यातला पहिला गुन्हाही सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह आशिष शिंदे, स्वप्नील कदम, शिवाजी शेजवळ, हर्षल चौधरी, महेश शेजवळ, पिंटू शिंदे, अनिल सोमासे, संजय भिकुले, अमोल भालेराव या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.