नाशिकमधील आयसीआयसीआय बँकेतून धाडशी चोरी झाली आहे. बँकेच्या सोने तारण शाखेत कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील आयसीआयसीआय बँकेच्या होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेतून ही चोरी झाली आहे. दोन चावी असणारे सेफ्टी लॉकर किल्लीने दोघांनी उघडले. त्यानंतर ४ कोटी ९२ लाख रूपये किंमतीचे दीड किलो सोने लांबवले आहे. दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे खळबळ उडली आहे. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे.
नाशिकमध्ये जुना गंगापूर नाका परिसरात icici बँकेची होम फायनान्स कंपनीची शाखा आहे. या बँकेत सेफ्टी लॉकर आहेत. या लॉकरमध्ये २२२ ग्राहकांचे १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवलेले होते. शनिवारी संध्याकाळी गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएट किरण जाधव एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले.
लॉकरला दोन चावी आहे. त्यांनी त्यांच्याकडे असलेली एक चावी आणि दुसरी चावी व्यवस्थापक सिद्धांत इकनकर यांच्याकडून घेतली. परंतु लॉकर उघडल्यावर त्यांना प्रचंड धक्का बसला. लॉकर पूर्ण रिकामे असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही बाब वरिष्ठांना सांगितली. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेच्या लॉकरमधील दागिने लंपास झाल्यानंतर बँकेतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरु केली. परंतु कोणालाही याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे बँकेचे तीन सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात मध्यरात्री दोन चोरटे दिसून आले. त्यांनी चेहरा झाकलेला होता. आता या सीसीटीव्हीच्या आधारावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
बँकेच्या सेफ्टी लॉकर उघडण्यासाठी दोन चावी लागतात. दोन चावी असल्याशिवाय लॉकर उघडत नाही. या दोन्ही चाव्या बँकेच्या वरिष्ठांकडे आहेत. यामुळे चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी दोन्ही चाव्या बँकेच्या कार्यालयातून घेतल्याची शक्यता आहे. चावी कुठे असते ही माहिती बँकेतील व्यक्तींना असल्याचा संशय पोलिसांना आहे.