नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) नोकरी (Job) शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षांच्या तरुणीला बसने चिरडल्याची घटना घडलीय. वैशाली शिवाजी गायकवाड असे तरुणीचे नाव असून, तिचा जागीच मृत्यू झाला. वैशाली ही शहर पोलीस (Police) आयुक्तालयातील अंमलदार शिवाजी गायकवाड यांची मुलगी आहे. या घटनेने पोलीस दलात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकीकडे प्रचंड वाढलेली बेरोजगारी आणि त्यात काळाने असा उगवलेला सूड पाहून सामान्य माणसांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. शिवाय गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्त्यावर बेफाम धावणारे वाहने पादचाऱ्यांचा कधी बळी घेतील याचा नेम नाही. त्यामुळे शहर परिसरात तरी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सक्ती करावी, अशा वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कशी घडली घटना?
वैशाली शिवाजी गायकवाड ही तरुणी शुक्रवारी नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली. ती मुख्य बसस्थानक परिसरात आली. त्यावेळी नंदुरबारकडे निघालेल्या बसने (एम.एच.15 बी.एल. 3445) वैशालीला चिरडले. एसटी बसस्थानकातून बाहेर पडली. त्यावेळी वैशाली रस्ता ओलांडत होती. वैशालीला बसची जबर धडक बसली. ती जागेवरच कोसळली. तिला चांगलाच मार लागला होता. त्यामुळे नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिच्या डोक्याला अंतर्गत गंभीर जखम झाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चालकाचा पोबारा
अपघात झाल्यानंतर बसच्या चालकाने वाहन जागीच सोडून पोबारा केल्याचे समोर आले. वैशालीचे वडील पोलीस आयुक्तालयात अंमलदार आहेत. तिच्या अपघाताची बातमी समजताच सरकार वाडा पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी तातडीने रुग्णालयात आले. मात्र, त्यांच्या कानावर वैशालीच्या निधनाची वार्ता पडली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली अतिशय हुशार होती. तिची अनेक स्वप्ने होती. आपल्या वडिलांचा आधार तिला व्हायचे होते. त्यासाठीच ती नोकरी शोधत होती. मात्र, तिच्यावर काळाने असा घाला घातला. त्यामुळे गायकवाड कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळाय.
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?