नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्या तीन मृत्यूंच्या घटनांनी हादरला आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही मृत्यू (Death) विहिरीत झालेत. यातील पहिल्या घटनेत देवगाव शिवारातल्या पोटे वस्तीजवळ एका विहिरीत दीर आणि भावजयीचा मृतदेह सापडलाय. दुसऱ्या घटनेत सटाणा तालुक्यात एका मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. या मजुराला तहान लागल्याने तो पाणी पिण्यासाठी गेला होता. मात्र, यावेळी त्याच्यावर काळाने झडप घातली. या घटनांबाबत सविस्तर माहिती अशी की, देवगाव शिवाराजवळच्या विहिरीत सकाळी एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी ही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांचे (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह काढायची तयारी सुरू केली. मात्र, त्यांना विरोध झाला. या महिलेचे वैजापूर येथील नातेवाईक आल्यानंतरच हा मृतदेह बाहेर काढावा, असा आग्रह धरला गेला. नातेवाईक आले. त्यानंतरच हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पायल रमेश पोटे (वय 19) असे या मृत महिलेचे नाव आहे.
महिलेचा मृतदेह वर काढण्यात आला. मात्र, त्यावेळेस विहिरीतील पाण्यावर एका पुरुषाच्या चपला तरंगताना आढळल्या. पोलिसांनी विहिरीत आणखी एखादा मृतदेह असू शकतो, असा संशय आला. त्यांनी पाण्याचा उपसा केला. तेव्हा गाळात संदीप एकनाथ पोटे (वय 27) या तरुणाचा मृतदेह सापडला. तो मृत महिलेचा दीर असल्याचे समजते. या दोघांचे मृतदेह एकाच विहिरीत सापडल्याने नाना चर्चेला उधाण आले आहे. हा घातपात आहे की, अपघात असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नाशिकच्या सटाणा तालुक्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय शेतमजूर तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. सटाणा तालुक्यातील ठेंगोडा आणि आराई या दोन्ही गावांच्या सीमारेषेवर असलेल्या एका शेतात मजुरीसाठी गेला होता. दुपारी तो कामावरून परत निघाला. दरम्यान त्याला तहान लागल्याने तो जवळच असलेल्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला. यावेळी पाणी पीत असताना त्याचा पाय घसरल्याने तो विहिरीत पडला. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. धनंजय रमेश जाधव, असे मृत तरुणाचे नाव असून, तो आराई येथील रहिवासी आहे.