पश्चिम बंगाल : इच्छित रक्कम दिली नाही म्हणून नवजात अर्भकाला तृतीयपंथीयाने बंदी बनवून तीन तास उपाशी ठेवल्याने बाळाचा उपासमारीने मृत्यू झाल्याची अत्यंत अमानुष घटना गुरुवारी पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात घडली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपी किन्नरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. माणिकचक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नवजात बाळाच्या जन्मानंतर आनंद साजरा करण्यासाठी हा तृतीयपंथी आला होता. त्यावेळी त्याने सदर कुटुंबाकडे काही रक्कम मागितली. परंतु इच्छित रक्कम मिळत नसल्याने आरोपीने बाळाला आईकडून हिसकावले. त्यानंतर तीन तास बाळाला आईपासून दूर ठेवत तृतीयपंथी ढोल वाजवत होता. शेवटी, उपासमारीमुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मालदा जिल्ह्यातील माणिकचकच्या बेंगळग्राम येथील रहिवासी मम्पी मांझी यांनी मालदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 29 ऑक्टोबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला. सकाळी स्थानिक तृतीयपंथी मुलाच्या जन्माच्या आनंदात पैसे मागण्यासाठी त्यांच्या घरी आले. त्यांनी कुटुंबाकडे 1200 रुपयांची मागणी केली. मात्र सदर कुटुंब अत्यंत गरीब असल्याने त्यांना तेवढे पैसे देणे शक्य नव्हते. त्यामुळे विनवण्या करुनही तृतीयपंथीयाने ऐकले नाही.
यानंतर तृतीयपंथीयाने आईकडून मुलाला हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. त्याने बाळाला तीन तास स्वतः जवळ ठेवले. तसेच ढोल वाजवत होता आणि मुलासमोर अश्लील नृत्य करत होता. मूल भुकेने रडत होते, पण तृतीयपंथियाने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी नवजात बालक भुकेने मरण पावले. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. स्थानिक लोकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात माहिती दिली. अखेर पोलिसांनी येऊन आरोपीला अटक केली.
याप्रकरणी माणिकचक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी तृतीयपंथीयाला फाशी द्यावी या मागणीसाठी संपूर्ण गाव आवाज उठवत आहे. पोलिसांनीही घटनेचा योग्य तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेबाबत संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून तृतीयपंथी अनेकदा अशी मनमानी करून मुलाच्या जन्मानंतर पैसे वसूल करतात. लोकांनी तृतीयपंथीयाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. (Newborn dies of starvation in West Bengal)
इतर बातम्या