पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. टिळेकर यांचे मामा सतीश वाघ ( वय 55) हे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले असताना आरोपींनी त्यांचं अपहरण केलं होतं. ही बातमी समोर येताच मोठी खळबळ माजली होती. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र संध्याकाळच्या सुमारास पुण्यातील निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह सापडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पुण्यातील हडपसर भागातील शेवाळेवाडी चौकातून चार ते पाच लोकांनी सतीश वाघ यांना गाडीत जबरदस्ती बसवून त्यांचं अपहरण केलं होतं. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं.
यानंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी सतीश वाघ यांचा शोध सुरु केला होता मात्र वाघ यांचा काही शोध लागला नाही. अखेर संध्याकाळच्या सुमारास शिंदवणे घाटात एका निर्जन जागी त्यांचा मृतदेह सापडला. अपहरण स्थळापासून ही जागा सुमारे 40 किलोमीटर इतकी लांब होती. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या बऱ्याच खुणा होत्या, असे पोलिसांनी सांगितलं. पोस्टमॉर्टम करण्याठी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मात्र वाघ यांचं अपहरण आणि हत्या नेमकी कोणी, का केली याचा पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचाही कसून शोध घेण्यात येत आहे.
खंडणीसाठी एकही फोन नाही, मग अपहरण आणि खून का ?
भाजपाचे आमदार असलेले योगेश टिळेकर यांच्या मामाचं दिवसाढवळ्या अपहरण झाल्याने प्रचंड गदारोळ माजला. एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचं अशाप्रकारे अपहरण होत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्नही उपस्थित झाला. त्यातच संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडल्याने गोंधळ आणखीनच वाढला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सतीश वाघ यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना अपहरणकर्त्यांकडून कोणताही फोन आला नाही किंवा खंडणीच्या रकमेची मागणीही करण्यात आली नाही. तसेच या अपहरणामागे कोणाचा हात असेल याबद्दल कुटुंबियांनाही काहीच कल्पना नसून त्यांनी कोणाचंही नाव घेत संशय व्यक्त केलेला नाही त्यामुळ हत्येचं गूढ आणखीनच वाढलंय.
सतीश वाघ यांना शेतीची आवड होती आणि शेवाळेवाडीजवळ त्यांचं एक हॉटेलही होतं अशी माहिती समोर येत आहे. त्यांचं अपहरण आणि हत्येनंतर याप्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून ज्या चौकातून त्यांना गाडीत बसवून अपहरण झाला तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. अपहरणकर्त्यांची गाडी ज्या मार्गावरून गेली तो सर्व मार्ग खंगाळण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हत्येच्या या घटनेने पुणेकरांमध्ये घबराट पसरली आहे. पुणे पोलीस सध्या हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खून काही वैयक्तिक वैमनस्यातून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.या कुटुंबीयांना कुठल्या प्रकारची धमकी दिली गेली होती का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. जमिनीचा वाद, वैयक्तिक संबंध किंवा अन्य कारणेही लक्षात ठेवून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. पोलिसांची 8 पथक राज्यातील विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.
थोड्या वेळात होणार अंत्यसंस्कार
दरम्यान आ. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची डेडबॉडी ससून रुग्णालयातून शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मांजरी येथील त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आली आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून थोड्याच वेळात योगेश टिळेकर हे वाघ यांच्या घरी अंत्यविधीसाठी पोहोचतील.