मुंबई: अँटालिया स्फोट प्रकरणापाठोपाठ आता मनसुख हिरेन प्रकरणही एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले असल्याची माहिती एनआयएच्या अधिकारी जया रॉय यांनी दिली आहे. हिरेन प्रकरणही एनआयएकडे गेल्याने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची डोकेदुखी वाढल्याचं सांगण्यात येत असून हे प्रकरण एनआयएकडे जाणं ही आघाडी सरकारची नामुष्की असल्याचं बोललं जात आहे. (now NIA take over mansukh hiren death case)
वाझेंच्या अडचणीत वाढ?
एनआयएकडून आतापर्यंत अँटालिया प्रकरणाची चौकशी केली जात होती. तर हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएसकडून केला जात होता. परंतु ही दोन्ही प्रकरणं एकमेकांशी समांतर असल्याने हे प्रकरण एनआयएकडे देण्याची मागणी होत होती. त्यामुळे अखेर हे प्रकरण एनआयएकडे गेलं आहे. संशयास्पद मृत्यूशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची चौकशी एनआयए करणार असल्याने वाझेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा एनआयए त्या दिशेने तपास करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
एटीएसच्या तपासावर असमाधान
हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे गेल्यानंतर या प्रकरणी एटीएसने अद्यापही वाझेंची चौकशी केली नाही. तर, दुसरीकडे एनआयएकडे अँटालिया प्रकरण जाताच त्यांनी वाझेंना चौकशीसाठी बोलावलं आणि त्यांना अटकही केली. अँटालिया प्रकरणात वाझेंची अटक झाल्यानंतरही एटीएसने मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी अद्यापही वाझेंना चौकशीसाठी बोलावलं नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एटीएसच्या या संथगती कारभारामुळेच एनआयएकडे हे प्रकरणही सोपवण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
राज्य सरकाची नामुष्की?
विरोधकांनी सुरुवातीपासूनच दोन्ही प्रकरणे एनआयएकडे देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने एटीएसची घोषणा करून हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, वाझे यांच्या अटकेनंतर वेगाने घडलेल्या घटनाक्रमामुळे अखेर हे प्रकरण एनआयएकडे गेलं आहे. ही राज्य सरकारची नामुष्की असल्याचं बोललं जात असून हे प्रकरण एनआयएकडे गेल्याने विरोधकांचं बळ वाढलं आहे.
गॉडफादर शोधले जाणार?
हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे गेल्याने वाझे यांचा गॉडफादर कोण हे सुद्धा शोधलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाझे यांना कोण ऑपरेट करत होतं? वाझे कोणत्या राजकारण्यांच्या इशाऱ्यावरून काम करत होते? वाझेंना नियमानुसार पोलीस दलात घेतलं का? आदी सर्व गोष्टींचा एनआयएकडून तपास केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (now NIA take over mansukh hiren death case)
VIDEO | SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 20 March 2021https://t.co/66mOzBZQG3
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या:
ATS ला धक्का, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक डेड बॉडी!
अंधुक दिवे, रस्त्यावर खुणा, कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने कसे केले नाट्य रुपांतरण?
(now NIA take over mansukh hiren death case)