भुवनेश्वर : पतंगाच्या मांजामुळे अनेक दुर्घटना झाल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मांजामुळे गळा कापून अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ओदिशातील कटकमध्येही पतंगाच्या मांजाने अशाच प्रकारे एकाचे प्राण घेतले. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
जयंत सामल हा कटकमधील भैरीपूर भागात राहत होता. रविवारी आपल्या बाईकने तो सासुरवाडीला जायला निघाला होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली. जयंतची पत्नीही त्याच्यासोबत बाईकवर मागे बसली होती. पीरबाजार भागातून जात असताना अचानक पतंगाच्या मांजा त्याच्या चेहऱ्यावर आला आणि तो जंजाळात अडकला.
पतंगाचा मांजा चाकू-सुऱ्यासारखाच धारदार असतो. या मांजामुळे जयंतचा गळा चिरला गेला. त्यामुळे रक्ताची चिळकांडी उडाली. जयंतचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि दोघंही जण खाली पडले. पादचाऱ्यांनी दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी जयंतला मृत घोषित केलं.
जयंतचं अवघ्या काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. तरुण मुलाच्या निधनामुळे सामल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो राहत असलेल्या परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जयंत सामलच्या कुटुंबीयांनी प्रतिबंधित मांजा विक्रेता आणि त्याचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात जगतपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. काचेचे तुकडे असलेल्या मांजामुळे अशा अनेक जीवघेण्या घटना घडल्या आहेत. यामुळे ओदिशा हायकोर्टाने कटक आणि आसपासच्या भागात मांजाच्या वापरावर बंदी घातली आहे.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र, गुजरातसह देशातील अनेक भागात पतंगाचा खेळ रंगतो. अशावेळी प्रतिबंध असलेला मांजा न वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
संबंधित बातम्या :
नोटांच्या थैलीशेजारी बॅग धरली, शिताफीने एक लाखाचं बंडल लांबवलं, जालन्यातील बँकेत चोराची हातचलाखी
बायकोने फारकत शब्द उच्चारताच नवऱ्याची दुथडी भरलेल्या गंगेत उडी…
महाडमध्ये महिला सरपंचाची हत्या, जंगलात विवस्त्र मृतदेह, बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय