भंडारा / तेजस मोहतुरे : शेतातील माल घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने साइड न दिल्याने ट्रॅक्टर पुलावरुन 30 फूट खाली चुलबंद नदित कोसळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे घडली. या दुर्घटनेत ट्रॅक्टरवरील एकाच जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अण्णा पारधी असे अपघातात मयत व्यक्तीचे नाव आहे. राष्ट्रपाल ठाकरे आणि राधेश्याम ढोरे अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
लाखांदूर येथील शेतकरी राष्ट्रपाल ठाकरे यांनी आपल्या शेतातील कडधान्य बाजार समिती येथे नेण्याकरीता आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरून निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी अण्णा पारधी आणि राधेश्याम ढोरे हे ही ट्रॅक्टरवर होते. लाखांदूर येथे पवनी-लाखांदूर मार्गावरील शिव मंदिर जवळील पुलावरुन जात असताना ही घटना घडली.
पुलावरुन जात असतानाच समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने साईड न दिल्याने ट्रॅक्टर अपघात होण्यापासून वाचविणाच्या नादात ट्रॅक्टर थेट 30 फूट खाली कोसळला. यात अण्णा पारधी यांचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रपाल ठाकरे यांच्या पाय मोडला असून, राधेश्याम ढोरे हे ही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांनी ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरु केला.