बीड : बीडमध्ये जबर हाणामारीची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या युवकाच्या घरात आठ दिवसांपूर्वीच एका चिमुकलीचं आगमन झालं होतं. त्याला कन्यारत्न प्राप्त झालं होतं. त्यामुळे त्याच्या घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण या आनंदावर काल (31 ऑगस्ट) विरझन पडलं. कारण काल त्याच्या घरासमोर झालेल्या हाणामारीत त्याचा मृत्यू झाला. डुकराच्या शिकारीवरुन हा वाद उफाळला होता. मृतक तरुणाचं नाव रवी धोत्रे असं आहे.
मृतक रवी धोत्रे यांच्या कुटुंबाचा वराह पालनाचा व्यवसाय आहे. वडारवाडा भागातील सर्व वराह धोत्रे कुटुंबाचीच आहेत. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून राहणाऱ्या सिकलकरी समाजाच्या लोकांचाही वराह पालनाचा व्यवसाय आहे. त्यामुळे धोत्रे कुटुंब आणि त्यांच्यात कदाचित याआधी देखील वाद उफाळला असावा. मात्र, यावेळी झालेला वाद प्रचंड टोकाला गेला आणि एका तरुणाचा मृत्यू झाला.
संबंधित घटना ही अंबाजोगाई शहरातील भर वस्तीत घडली. या हाणामारीत रवी धोत्रे यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या गटातील दोघे जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सिकलकरी समाजाचे दिपसिंग टाक, हिंमतसिंग आणि विरुसिंग हे काल मृतक धोत्रे यांच्या घरासमोर आले. यावेळी त्यांनी एका डुकराच्या पिल्लू मारले. डुकराच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून रवी घराबाहेर आला. त्याने शिकार करणाऱ्या तिघांना आमच्या डुकराला कशाला मारहाण करतो? असा सवाल केला. त्यावर तुमचे कशाचे डुक्कर, आमचे डुक्कर होते, असं तिघंजण म्हणाले. यावरुन त्यांच्यात वाद झाला.
वाद सुरु असताना दिपसिंग टाक, हिंमतसिंग आणि विरुसिंग यांनी त्यांच्या इतर साथीदारांना फोन लावून बोलावलं. त्यानंतर त्यांचे साथीदार तलवार, चाकू, खंजीर, काठ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ दाखल होताच रवी धोत्रेवर तलवारी आणि चाकूने हल्ला केला. यावेळी रवीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचा भाऊ आणि वडील तिथे आले. पण हल्लेखोरांनी त्यांनादेखील मारहाण केली. यावेळी आरडाओरड ऐकून धोत्रे यांचे इतर नातेवाईक धावत येत असल्याचे बघून आरोपींनी पळ काढला.
संबंधित घटनेनंतर कुटुंबियांनी रवीला तात्काळ रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी रवीला मृत घोषित केलं. धोत्रे कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. हल्लेखोरांपैकी दोन जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावरही लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा :
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, प्रकरणाचे धागेदोरे विदेशात
सावकारांच्या जाचाला कंटाळून दोघांची आत्महत्या, हातावर आरोपींच्या नावांचा उल्लेख, परभणीत खळबळ