नाझिर खान, प्रतिनिधी, परभणी : परभणीचे (Parbhani Accident) खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) याच्या गाडीला अपघात झाला. नवरात्रीच्या निमित्ताने ते एका बैठकीसाठी जात होते. यावेळी खासदार संजय जाधव यांच्या स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) गाडीची आणि एका आय-ट्वेन्टी कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातातून संजय जाधव अगदी थोडक्यात बचावलेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचं नुकसान झालंय.
संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी खासदार संजय जाधव निघाले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही चालकांनी गाड्या नियंत्रित केल्या असल्या तरी धडक काही त्यांना रोखता आली नाही. मात्र वेळीच ब्रेक लावल्यानं मोठा अनर्थ टळला. दोन्ही गाड्यांच्या बोनेटला या अपघातामध्ये फटका बसलाय.
या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने संजय जाधव यांची स्कॉर्पिओ गाडी हटवण्यात आली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने अपघात झालेल्या ठिकाणी येत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी यावेळी प्रयत्न केले.
या आधी अनेकदा राजकीय नेत्यांच्या गाड्यांचे अपघात झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्ते अपघातांचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला होता. दरम्यान, मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे गेल्या काही महिन्यात अपघात झाल्याचं पाहायला मिळालंय.
भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, नितेश राणे, तानाजी सावंत यांच्यासह अनेक गाड्यांच्या अपघात झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे अगदी थोडक्यात शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निवासस्थानीही स्लॅब पडला होता. पण ते यातून अगदी थोडक्यात बचावले होते. अपघात किरकोळ असले, तरी काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय राजकीय नेत्यांना अपघातातून आला होता. दरम्यान, आता शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या कारचा अपघात झाला. त्यामुळे रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.