Ahmadnagar Crime : दबक्या पावलांनी यायचे आणि चेन खेचून फरार व्हायचे… अखेर ‘त्या’ दुकलीला अटक !

| Updated on: Sep 12, 2023 | 9:53 AM

रस्त्यावरील नागरिकांच्या गळ्यातील चेन लुटून पोबारा करणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लाखोंचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हेही दाखल असल्याचे समजते.

Ahmadnagar Crime : दबक्या पावलांनी यायचे आणि चेन खेचून फरार व्हायचे... अखेर त्या दुकलीला अटक !
Follow us on

अहमदनगर | 12 सप्टेंबर 2023 : शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटना या पोलिसांसाठी डोकेदुखी बनल्या आहे. चेन स्नॅचिंगच्याही (chain snatching) अनेक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवत कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्याचदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चेन खेचून पोबारा करणाऱ्या आरोपींना बेड्या (2 arrested) ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल १० तोळे सोन्यासह एकूण ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सापळा लावून पोलिसांनी या भामट्यांना अटक केली होती.

नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी, लहू काळे आणि विनोद पिपंळे हे चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी नगर मनमाड रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नगर मनमाड हायवेवर सापळा लावला आणि आरोपींना अटक केली. आरोपी लहू काळे व विनोद पिंपळे या दुकलीकडून तब्बल १० तोळे सोने हस्तगत करण्यात आले. तसेच पल्सर ही बाईक आणि एकूण ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

नाशिक येथे राहणाऱ्या लहू काळे आणि विनोद पिंपळे या आरोपींची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी चोरीची कबुली दिली. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर राहुरी तसेच नाशिक नवी मुंबई येथे मोठी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपी लहू काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नाशिक आणि नगर जिल्ह्यात तब्बल १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरा आरोपी गोविंद पिंपळे याच्यावर देखील ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.