कल्याण : रेल्वेत (Railways) चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. विशेष : रेल्वेत चढताना आणि उतरताना चोर प्रवाश्यांच्या दागिन्यांसह सामानावर हात साफ करतात. नुकताच कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानकावर देखील अशीच एक घटना घडलीये. गर्दीचा फायदा घेत रेल्वे स्थानकात चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना रंगेहात पकडण्यात आले. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकीला अटकही केलीये. मात्र, दुसरी बहिण अद्याप फरार असून पोलिस (Police) तिचा शोध घेत आहेत. पूजा रमेश शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव असून तिची बहिण हिना रवी भोसले फरार आहे.
झाले असे की, कल्याणच्या भोईवाडा परिसरात राहणाऱ्या मिस्बा बागबान या आपला भाऊ आणि नणंदेसोबत जनशताब्दी एक्स्प्रेसने 2 जून रोजी औरंगाबादला जात होत्या. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात आलेल्या एक्स्प्रेस गाडीत चढताना त्यांनी आपले 1 लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने डब्यात ठेऊन पर्स खांद्याला अडकवली. गर्दीचा फायदा घेत पूजा हीने मिस्बा यांच्या पर्समध्ये हात घालून दागिन्याच्या डबा काढून घेतला. मात्र, आपली पर्स खेचली जात असल्याचे पाहून मिस्बा यांनी पूजाचा हात पकडून तिला जाब विचारला. इतक्यात पूजाने मिस्बा यांच्या हाताला जोरात झटका देत तेथून पळ काढला.
यादरम्यान मिस्बा यांनी थोडाही वेळ वाया न घालवता बाहेर थांबलेल्या आपल्या पतीला फोन करत घडलेला प्रकार सर्व सांगितला. मिस्बा यांचे पती महमंद यांनी त्या महिलेला पकडून कल्याण रेल्वे पोलिसात आणले. मात्र, तिची झडती घेतली असता दागिन्यांचा डबा मिळाला नाही. मग पोलिसांनी खाकी दाखवत तिची चौकशी केली असता तिने आपल्या बहिणीकडे दागिन्याचा डबा देत पर्समध्ये आणखी दागिने आहेत का याचा शोध घेत असल्याचे सांगितले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार हिनाचा शोध सुरु केलाय. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिना आणि पूजा या दोन बहिणी असून त्या औरंगाबाद मधील बिडकीन तालुक्यातील चित्तेगावच्या रहिवासी आहेत. या दोन बहिणी मागील अनेक दिवसांपासून लोकलमध्ये देखील चोरी करत असल्याचे कळते आहे.