बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. गुरुवारी मध्यरात्री सैफच्या घरात एका चोराने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी पत्नी करीना कपूर दोन मुलं जेह आणि तैमूर घरात होते. त्याशिवाय या मुलांचा सांभाळ करणाऱ्या नॅनी सुद्धा सोबत होत्या. सैफ अली खान-करीना कपूर हे जोडपं वांद्र्याच्या सतगुरु शरण इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतं. सैफच्या घरात 12 व्या मजल्यापर्यंत चोर पोहोचलाच कसा? याचा तपास करताना पोलिसांना एका गोष्टीच आश्चर्य वाटलं. सैफ अली खान आणि करीना कपूर हे क्वाड्रूप्लेक्स घरात राहतात. म्हणजे सैफच्या फ्लॅटच्या आत चार मजले आहेत. इतकं मोठ घर असूनही सैफच्या घराच्या आत आणि बाहेर एकही टेहळणी कॅमेरा नाहीय. पोलिसांना याचं आश्चर्य वाटलं. कारण यामुळे चोराने घरात घुसल्यानंतर आतमध्ये काय हालचाली केल्या हे समजू शकत नाहीय.
सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर हा चोर इमारतीच्या जिन्यावरुन खाली उतरला. त्यावेळी तिथे असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचा चेहरा कैद झाला. पण सैफच्या घराच्या आतील आणि बाहेरील त्याच्या हालचालींची माहिती मिळू शकत नाहीय. सैफच्या घराजवळ पुरेशी सुरक्षा व्यवस्थाच नाहीय, याच तपास करणाऱ्या पोलिसांना आश्चर्य वाटलं. गुन्ह्याच्यावेळचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलीस टीम, फॉरेन्सिक पथक आणि फिंगर प्रिन्ट स्पेशलिस्ट सैफच्या घरी गेले होते.
तपास अधिकाऱ्याने काय सांगितलं?
“कोण आलं, कोण गेलं किंवा एखादी इमर्जन्सी आली, तर अशावेळी मदत करण्यासाठी सैफच्या फ्लॅटच्या प्रवेशद्वारावर किंवा आतमध्ये एकही सुरक्षा रक्षक नाहीय. सोसायटीत कोण येतं-जातं यासाठी इमारतीत नोंदणी वही सुद्धा नाहीय” असं पोलिसांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. “इतक्या हाय-प्रोफाइल कपलच्या सुरशा व्यवस्थेची ही स्थिती पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. हा फक्त सैफ-करीनासाठीच नाही, तर अशीच स्थिती असलेल्या इतरांसाठी सुद्धा इशारा आहे” असं वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने सांगितलं.