अकोला : गोरगरिबांना शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली मार्फत देण्यात येणारा 600 क्विंटल गहू अकोल्याच्या खामगाव येथून हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी रेशनचा गहू पकडल्याने रेशन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकाला खबऱ्या मार्फत गोपनीय माहिती मिळाली होती. खामगाव येथून शासकीय रेशनचा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी उर्वरित काम केलं.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या चमूतील कर्मचाऱ्यांनी, बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, राष्ट्रीय महामार्गावरील साई ढाबा येथे नाकाबंदी करून, खामगावच्या दिशेने येणाऱ्या AP-20,TB-4699 क्रमांक असलेल्या ट्रकला थांबवून झडती घेतली असता, सदर ट्रक मध्ये सरकारी रेशनच्या गव्हाची 600 पोते, त्याचे वजन 30 टन आहे…सदर गहू कोणाचा आहे, कुठे नेण्यात येत आहे, याबाबत ट्रक चालकाला विचारपूस केली असता, सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
परंतु पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर, हा गहू शासकीय रेशनचा असून, तो गहू तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे विक्रीसाठी जात असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून तेलंगणाच्या आदीलाबाद येथील 28 वर्षीय ट्रक चालक शेख जावेद ख्वाजा याला अटक करून, त्याच्याकडून 6 लाख रुपयांचा 30 टन गहू, 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
ट्रक चालकाविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात, भारतीय जीवनावश्यक अधिनियम च्या कलम 3,7 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आणि काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या या रेशनचा मालक कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा :
जाचाला कंटाळून विवाहितेचा गळफास, माहेरच्यांनी सासरच्या दारातच चिता पेटवली
देश हादरवण्याचा कट, सातवी कारवाई, जोगेश्वरीतून आणखी एकाला उचलला, ATS-CBI अॅक्शन मोडमध्ये!
पुण्यात तहसीलदाराला ‘गुगल पे’वरुन जबरदस्तीने 50 हजाराची लाच देणाऱ्या दोघांना अटक