ठाणे : ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस (Lady Police) कर्मचाऱ्याने ओढणीच्या साहाय्याने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अनिता भीमराव वाव्हळ असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती वादातून (Family Dispute) वाव्हळ यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. वाव्हळ यांच्या पश्चात दोन मुली आणि पती असा परिवार आहे.
अनिता वाव्हळ 2008 च्या बॅचच्या महिला पोलीस कर्मचारी होत्या. गेल्या तीन वर्षापासून श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होत्या. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाव्हळ यांनी ड्युटीवर असतानाच पोलीस ठाण्यातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अनिता यांनी घरगुती वादातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत सखोल तपास पोलीस करत आहेत. तपासाअंतीच सत्य उघड होईल. अनिता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणी मंगळवेढा येथील कारागृहात असलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास मंगळवेढा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सब जेलमध्ये घडली. तानाजी शंकर किसवे (21 रा. शिरनांदगी ता. मंगळवेढा) असं आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आरोपी तानाजी किसवे याच्यावर लैंगिक अत्याचारासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आरोपीला मंगळवेढा न्यायालयाने जामीन नाकारल्याने सध्या त्याला येथील सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याने सब जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Policewoman committed suicide in Thane by hanging herself in the police station itself)