नाशिकः नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत विधिमंडळ अधिवेशनात आवाज आठवणार आहोत. अमोल इघे (Amol Ighe) खून प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असा आरोप रविवारी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. त्यांनी आज मृत अमोल इघे यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले.
राजकीय वळण का?
नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास निर्घृण खून झाला. त्यांना घराबाहेर बोलावून त्यांच्यावर शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विनोद उर्फ विनायक बाळासाहेब बर्वे (वय 38, श्रमिकनगर) याला बेड्या ठोकल्या आहेत. राजकीय युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित आरोपी हा राष्ट्रवादीच्या कामगार वंचित आघाडीचा पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. त्याने महिन्याभरापूर्वी नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे.
आरोपीवर मोक्का लावा
दरेकर यांनी रविवारी इघे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, या प्रकरणात जबाबदार कोण त्याचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत. युनियनचे रजिस्ट्रेशन नसताना कोणी बोर्ड लावले, अस सवाल त्यांनी केला. अनेक पुढारी गेले. आरोपीवर मोक्का लावा, प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
युनियनच्या बोर्डचे उद्घाटन कोण केले?
दरेकर म्हणाले की, येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात नाशिकमधील वाढती गुन्हेगारी आणि अमोल इघे खून या प्रकरणावर आवाज उठवणार आहे. सोबतच युनियनच्या बोर्डचे उद्घाटन कोणी केले, ज्यांच्यावर संशय आहेत, त्यांचे कोणासोबत फोटो आहेत, असा सवालही त्यांनी केला. देशात महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे. जिथे सचिन वाझे आणि गृहमंत्रीच जेलमध्ये असतील, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पेट्रोल पंपावरील तैनात फौजफाटा वापस बोलावला; नाशिकमधील हेल्मेटसक्तीवर 8 दिवसांत होणार सुनावणी