असं कुणी मारतं का?… शिक्षिकेची विद्यार्थीनीला हात सुजेपर्यंत बांबूने मारहाण…; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार

| Updated on: Dec 11, 2023 | 9:12 PM

नवी मुंबईत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शिकवणीतील ही धक्कादायक घटना आहे. एका शिक्षिकेने थेट विद्यार्थीनीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शिक्षिकेने विद्यार्थीनीला बांबूने मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

असं कुणी मारतं का?... शिक्षिकेची विद्यार्थीनीला हात सुजेपर्यंत बांबूने मारहाण...; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार
student
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई | 11 डिसेंबर 2023 : शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यांना आदर्श व्यक्ती बनवण्याचं काम करत असतात. विद्यार्थी चुकला तर त्याला सल्ला देतात. योग्य मार्गदर्शनही करतात. प्रसंगी रागावतात. दटावतात आणि छडीचा मारही देतात. पण शिक्षक कधी विद्यार्थ्यांना बांबू किंवा लाकडी फळीने बेदम मारत नाहीत. नवी मुंबईत मात्र एका शिक्षिकेने विद्यार्थ्यीनीला बांबूचे फटके दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थीनीच्या हातातून रक्त येईपर्यंत त्याला प्रचंड मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या शिक्षिकेला अटक करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

नवी मुंबई स्मार्ट सिटी ओळखली जातेय मात्र नवी मुंबईत आजकाल रोज विचित्र प्रकार घडतं आहेत. घरी गृहपाठ म्हणून दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला खासगी ट्युशन टीचरने बेदम मारहाण केल्याची घटना घणसोलीत घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घणसोली गावात राहणारी विद्यार्थीनी घणसोली सेक्टर 5 येथे सना या खासगी शिकवणीला जात होती. या विद्यार्थीनीच्या शिक्षिकेने तिला गणिताचा गृहपाठ दिला होता. पण विद्यार्थीनीकडून गणित चुकले. त्यामुळे या शिक्षिकेने विद्यार्थीनीला आधी दमदाटी दिली. तिच्यावर खेकसली. त्यानंतर या विद्यार्थीनीला बांबू आणि लाकडी फळीने जोरदार मारहाण केली.

विद्यार्थ्यांमध्ये दहशत

अंगात भूत संचारल्यासारखी ही शिक्षिका विद्यार्थीनीला चोप देत होती. मारहाणीमुळे विद्यार्थीनीच्या शरीरातील अनेक भागावर सूज आली. या विद्यार्थीने पालकांना घडला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून या शिक्षिकेच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणी शिक्षिका शकीला अन्सारी हिच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या प्रकाराने नवी मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांना ट्युशनला पाठवायचे की नाही? असा प्रश्न सध्या पालकांमध्ये उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांमध्येही या प्रकारानंतर दहशत निर्माण झाली आहे.

आपल्या पाल्यांना चागंलं आणि उत्तम शिक्षण मिळावं म्हणून अनेक पालक खासगी शिकवणीचा रस्ता धरतात. मुलांना खासगी शिकवणीत टाकतात. त्यासाठी पैसेही मोजतात. विद्यार्थीही शाळेतून घरी आल्यावर खासगी शिकवणीला नियमित जात असतात. पण अधूनमधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे प्रकार कानावर येतात. या शिकवण्यांची कुठेही नोंद नसते. त्यांना कोणतेही नियम नसतात. कुणाचंही बंधन नसतात. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचं पालकांचं म्हणणं आहेय