पुणे : आपल्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून लहानपणी आपले आई-वडील आपल्याला बऱ्याचदा धपाटे देतात. अर्थात त्यामागे त्यांचा हेतू हा चांगलाच असतो. आपल्याला चांगली शिस्त लागावी म्हणून त्यांचा खटाटोप असतो. पण बऱ्याचदा आपले आजी-आजोबा आपल्याला त्यांच्यापासून वाचवतात. ते आपल्या आई-वडिलांची समजूत काढतात. याशिवाय त्यांचं नातवंडांवर प्रचंड प्रेम असतं. मुद्दलपेक्षा व्याज जास्त गोड लागतं, अशी एक म्हण आहे. अगदी तसंच आपल्या मुला-मुलींपेक्षा त्यांची मुलं म्हणजे नातवंड त्यांना जास्त जवळची वाटतात. त्यामुळे अनेक आजी-आजोंबाकडून नातवंडांचे लाड पुरवले जातात. पण काही नातवंड हे जास्त लाड पुरविल्याने त्यांना त्यांची किंमत राहत नाही. ते इतके कठोर होतात की आपण काय करतो याचं देखील त्यांना भान राहत नाही. अशीच काहिशी घटना पुण्यात घडली आहे.
पुण्यात ज्या आजीने नातवाला लहानपणापासून सर्व गोष्टी दिल्या, त्याचा हट्ट पुरवला त्याच नातवानं आजीसोबत अमानुष कृत्य केलं. त्याने आजीला प्रचंड मारहाण केली. विशेष म्हणजे त्याने चाकून तिच्यावर हल्ला करत जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे पीडित आजी ही आतून खचली आहे. आपला नातू आपल्यासोबत पुन्हा असं कृत्य करायला नको म्हणून तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पीडित 56 वर्षीय आजीची तक्रार ऐकल्यानंतर पोलीसही हैराण झाले. दरम्यान, आजीने आपल्या नातवाचा इतका लाड पुरवायला नको होता, असंही मत आता संबंधित परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.
पीडित आजी ही पुण्याच्या लोहियानगर परिसरात वास्तव्याला आहे. या आजीच्या 18 वर्षीय नातवाला वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत. याशिवाय तो काहीच कामधंदा करत नाही. तो शिक्षणाकडेही लक्ष देत नाही. तो आपल्या आजीकडे पैशांचा हट्ट करतो. त्याच्या हट्टाला बळी पडून आजी त्याला पैसे द्यायची. पण त्या पैशातून आरोपी वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करायचा. त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या घरातील इतर सदस्यही त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे तो आजीकडे येऊन तिला पैशांसाठी खूप सतवायचा.
पीडित आजीने केलेल्या तक्रारीनुसार तिच्या मुलीचा मुलगा म्हणजेच तिचा 18 वर्षीय नातू हा शनिवारी (2 ऑक्टोबर) तिच्या घरी आला. तो नशेसाठी आपल्या आजीकडे पैसे मागू लागला. पण आजीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. आजीच्या नकाराने तो इतका रागावला की त्याने थेट आजीवर हल्ला केला. त्याने आजीला थेट बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने हाताने देखील आपल्या आजीला मारहाण केली. यावेळी आरोपी नातवाने आजीच्या पाठीवर आणि पोटातही मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आजीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
आरोपी नातवाच्या हल्ल्यामुळे आजी वेदनांनी व्हिव्हळत होती. तिने आरडाओरड केली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घरात येतील म्हणून तो लगेच तिथून पळून गेला. अखेर पीडित महिलेने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या नातवाविरोधात तक्रार देणं हे पीडितेसाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण होतं. पण नातवाने केलेल्या कृत्याची त्याला शिक्षा व्हावी आणि त्याच्यात चांगला बदल व्हावा या विचाराने आजीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
हेही वाचा :
बाबा शाहरुखशी बोलताना आर्यन ढसाढसा रडला, NCB म्हणाली दोन मिनिटांत आटप
75 बांग्लादेशी मुलींशी लग्न, दोनशे जणींना देह व्यापारात ढकललं, मुंबई-पुण्यासह देशभरात जाळं