पुणे : 10 सप्टेंबर रोजी भोसरी एमआयडीसीतील (Bhosari MIDC) एका इमारतीच्या गच्चीत सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. बेपत्ता असलेल्या आदित्य ओगले (Aditya Ogle) या सात वर्षीय मुलाचा हा मृतदेह असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालेली. अपहरण आणि हत्या (Pimpri Chinchwad Kidnapping and Murder Case) करण्यात आलेल्या आदित्यसोबत नेमकं काय घडलं? हे हत्याकांड का घडलं? याचा उलगडाही आता झाला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावलाय. हे हत्याकांड पैशांसाठी नाही, तर प्रेमासाठी करण्यात आलं होतं, असा खळबळजनक खुलासा पोलीस तपासातून करण्यात आलाय. आरोपीला पोलिसांनी अटकही केली असून त्याने गुन्ह्याची कबुलीदेखील दिलीय.
आदित्यच्या मोठ्या बहिणीवर आरोपीचं एकतर्फी प्रेम होतं. एकतर्फी प्रेमातूनच आदित्यचं अपहरण करण्यात आलं होतं. राहत्या इमारतीच्या पार्किंग लॉटमधून आदित्यचं अपहरण करण्यात आलं होतं. आदित्य मदतीसाठी आरडाओरडा करत होता. त्यामुळे आरोपीने त्याचं नाक आणि तोंड दाबलं. यामुळे श्वास गुदमरल्यानं आदित्यचा जीव गेला होता. अखेर घाबरलेल्या आरोपीने आदित्यचा मृतदेह भोसरी एमआयडीसी परिसरातील एका इमारतीच्या गच्चीत नेऊन टाकला होता.
याप्रकरणी पोलिसांनी ज्या आरोपीला अटक केली आहे, त्यानेच आधी आदित्यच्या कुटुंबियांना एसएमएस करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांना हे प्रकरण अपहरणाचं वाटावं म्हणून आरोपीने हे कृत्य केलं होतं. पण आदित्यची हत्या पैशांसाठी नाही, तर आदित्यच्या मोठ्या बहिणीवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून झाली असल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालंय. पोलिसांनी या हत्याप्रकरणी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समदार यांना अटक केली होती.
आरोपी मंथन हा स्वतः अपहरण झालेल्या आदित्यची मदत करण्यासाठी ओगले कुटुंबियांना सहकार्य करत असल्याचं भासवत होता. पोलीस तपासातही तो मदत करत होता. पण खंडणीसाठी ज्या नंबरवर एसएमएस करण्यात आला होता, त्या नंबरचा सायबर पोलिसांनी तपास केला. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला. या नंबरनेच मंथनने रचलेलं हत्याकांड उघडकीस आणलं. मंथन याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली.
अपहरणाच्या 10 दिवस आधीपासून मंथन आणि त्याच्या सहकाऱ्याने हा प्लॅन रचला होता. आरोपी मंथन हा आदित्यच्याच इमारतीत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोसायटीच्या मालकांकडून त्याच्याविरोधात याआधीही अनेक तक्रारी दाखल झाल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. आदित्यचं अपहरण केल्यानंतर मंथन याने उत्तर प्रदेशातील एका मजुराच्या फोनची मदत घेतली होती.
एकतर्फी प्रेमातून आपण हे कृत्य केलं आहे, याची कुणालाही पुसटशीही कल्पना येऊ नये, यासाठी आरोपी मंथन याने 20 कोटी रुपयांच्या खंडणीचा अज्ञात नंबरवरुन मेसेज केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आदित्यचे वडील गजानन ओगले यांना एक एसएमएस पाठवला.
गजानन ओगले यांनी आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. खंडणीचा मेसेज आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण त्यानंतर काही तासांत आदित्यचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. अखेर आता या हत्याकांडाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आलंय.