पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत दिघी परिसरात एका तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांच्या दबावामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दिघी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ठिय्या सुरु केला आहे. वृषभ मुकुंद जाधव असे मयत तरुणाचे नाव आहे. वृषभवर दबाव टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आंदोलनादरम्यान दमदाटी केल्याचा आरोप देखील आंदोलनाकर्त्यांनी केला. यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यातून मृतदेह हलवला आहे.
वृषभ आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. याच कारणातून त्याने पत्नीविरोधात घटस्फोटाची केस कोर्टात दाखल केली होती. ही केस पत्नीच्या बाजूने लागली. पत्नीला घरी राहण्यास द्यायचे किंवा पैसे द्यायचे असा पर्याय वृषभसमोर न्यायालयाने निकालादरम्यान ठेवला होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार दिघी पोलीस त्याच्या पत्नीसह याबाबत समझोता करण्यासाठी घरी गेले होते. न्यायालयाने दिलेल्या पर्यायाबाबत समजूत काढून पोलीस तेथून निघून गेले. त्यांच्यासोबत पत्नीही निघून गेली.
काही वेळाने पत्नी आपल्या नातेवाईकांना घेऊन वृषभच्या घरी दाखल झाली. यावेळी वृषभ आणि पत्नीच्या नातेवाईकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर वृषभला अस्वस्थ वाटू लागले आणि तो खाली कोसळला.
वृषभला घरच्यांनी तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिघी पोलिसांनी दबाव टाकल्याने आपल्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन सुरु केले.
जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह हलवला, अशी माहिती गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली आहे.