खिशातून पिस्तूल काढली, मोबाईल दुकानदारावर रोखली, नंतर गोळीबार, आरोपीने असं का केलं ज्याने पुणे हादरलं?

| Updated on: Aug 16, 2021 | 8:04 PM

गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी दाखल झाले. आरोपी किरण हा तिथून पळून गेला. यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकंनी वाकड पोलिसांना तातडीने माहिती दिली.

खिशातून पिस्तूल काढली, मोबाईल दुकानदारावर रोखली, नंतर गोळीबार, आरोपीने असं का केलं ज्याने पुणे हादरलं?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : पुण्याचं पिंपरी चिंचवड शहर रविवारी (15 ऑगस्ट) रात्री एका गोळीबाराच्या घटनेने हादरलं. खरंतर या गोळीबारामागे फार मोठं काहीच कारण नव्हतं. फक्त एका क्षुल्लक कारणाने माजखोर आरोपीने एका मोबाईल दुकानदारावर गोळी झाडली. या दुर्घटनेत दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

आरोपी मोबाईल चार्जर घ्यायला गेला आणि…

संबंधित घटना ही पिंपरी चिंचवडच्या रहाटणी परिसरात घडली. आरोपी मोबाईल चार्जर घेण्यासाठी मोबाईल दुकानात गेला होता. यावेळी दुकानदारासोबत झालेल्या किरकोळ वादावरुन त्याने थेट गोळीबार केला. या गोळीबारात मोबाईल दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. सोहेल इनामदार असं मृतक दुकानदाराचं नाव आहे. तर किरण वासरे असं आरोपीचं नाव आहे.

आधी दोघांमध्ये किरकोळ वाद, नंतर गोळीबार

आरोपी किरण वासरे हा तरुण मोबाईलचं चार्जर घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. तो सोहेल इनामदार यांच्या मोबाईल दुकानात आला. किरण याच्या खिशात पिस्तूल होती. त्याने ती पिस्तूल आपल्या खिशातून बाहेर काढली. ही पिस्तूल सोहेल यांना दिसली. यावेळी त्यांनी आरोपीला पिस्तूल घेऊन का आलास, खिशातून बाहेर का काढली? असे सवाल केला. तसेच तू इथून निघून जा, नाहीतर पोलिसात तक्रार करेन, असं म्हटलं. याच गोष्टीवरुन किरण आणि सोहेल यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की थेट गोळीबारापर्यंत पोहोचला. आरोपी किरण याने सोहेल यांच्यावर गोळीबार केला.

हत्येमागे दुसरं काही कारण?

या गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी दाखल झाले. आरोपी किरण हा तिथून पळून गेला. यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकंनी वाकड पोलिसांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी वेळ न दडवता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी किरण यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत आरोपी किरण वासरे याला बेड्या ठोकल्या. या आरोपीकडे पिस्तूल कुठून आणले, तसेच हत्येमागे दुसरं काही वेगळं कारण आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले