पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दुसरीकडे पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला ससून रुग्णालयाच्या गेटवर ललित पाटील याच्या व्यक्तीकडून दोन कोटींचे ड्रग्स जप्त केले होते. त्यानंतर ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला. त्याला १८ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी कर्नाटकात अटक केली. सध्या तो मुंबई पोलिसांच्या कस्टडीत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये ललित पाटील याने ड्रग्स बनवण्याचा कारखाना कसा उभा केला? त्याला कोणी मदत केली? ही माहिती समोर आली आहे.
ललित पाटील हा चाकन येथील ड्रग्स प्रकरणात पोलिसांना सापडला होता. तो येवरडा कारागृहात असताना त्याला अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे भेटला. लोहरे हा केमिकल इंजिनिअर होतो. त्यानेच ललित पाटील यांना ड्रग्स कसे बनवायचे याचे धडे दिले. त्यानंतर त्याने फार्म्युलाही दिला. त्यानंतर हाच फार्म्युला ललित पाटील याने त्याचा भाऊ भूषण पाटील याला दिला. त्यातून नाशिकमध्ये केमिकल फॅक्टरीची उभारणी केली. त्यानंतर ललित पाटील ड्रग्स माफिया बनला.
चाकणच्या ड्रग्ज केसमध्ये अटक केल्या नंतर ललित पाटील हर्नियाच्या उपचारसाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तो येरवडा कारागृहामध्ये असताना त्याच्या भावाने कंपनी टाकली. लोहरे येरवडा कारागृहात आहे. त्याला आता या गुन्ह्यात वर्ग करुन त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
रिहान शेख अन्सारी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांकडून पुणे पोलिसांनी रिहान अन्सारीचा ताबा घेतला आहे. ललित पाटील प्रकरणात रिहान अन्सारी यालाही मुख्य आरोपी करण्यात आले आहे. नाशिकमध्ये ड्रग्स कंपनीचा सेटअप उभारण्यासाठी रिहान अन्सारी याने ललित पाटील याला मदत केली होती. नाशिकच्या कंपनीत बनणारा ड्रग्सचे रिहान अन्सारी सप्लाय करत होता. रिहान अन्सारी याने ड्रस विक्रीतून पैशांची मोठी देवाघेवाण केल्याची माहिती आहे.