पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे. राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. परंतु पुणे शहराची वाटचाल आता पश्चात्य संस्कृतीकडे होऊ लागली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ले करण्याचे प्रकार पुण्यात वाढू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी एमपीएससी पास दर्शना पवार हिची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली होती. त्यानंतर पुण्यातील पेरुगेट चौकीजवळ भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. त्यावेळी जमावाने हल्लेखोरांना पकडल्यामुळे ती युवती वाचली. आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून भरदिवसा अकरावीत शिकणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक 6 मध्ये ही घटना घडली. यावेळी महिलांनी आरडा-ओरडा केल्यामुळे दुचाकीवरुन आलेले आरोपी पळून गेले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
पुणे येथील महेश सिद्धप्पा भंडारी (वय.22,रा. जनता वसाहत) याचे एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर प्रेम होते. ती मुलगी बोलत नाही, तिने प्रेमसंबंध संपवले, या रागातून महेश आणि आणखी एकाने तिला भररस्त्यात अडवले. तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलांना आरडाओरड केली. यामुळे दुचाकीवरुन आलेले हे दोघे तरुण पळून गेले. परंतु जाताना त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकवले. कोयता फेकत दहशत निर्माण केली.
कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा तरुण तळजाई टेकडी परिसरात पळून गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलगी बोलत नसल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने प्राथमिक चौकशीतून सांगितले. त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. महेश जनता वसाहतीत राहत आहे. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडल्यानंतर या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील पेरुगेट पोलीस चौकीजवळ युवतीवर हल्ला झाला होता. त्यावेळी स्थानिक तरुणांनी त्या तरुणास पकडले. त्यामुळे ती तरुणी बचावली होती. त्यावेळी पेरुगेट पोलीस चौकीवर एकही पोलीस नव्हता. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी काही जणांचे निलंबन केले होते.