Pune lonkar brother: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला आहे. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमधील युवकांचा सहभाग आढळला आहे. परंतु महाराष्ट्रातील लोणकर बंधूंचा महत्वाचा रोल स्पष्ट झाला आहे. या हत्या प्रकरणातील शूटर्सना लोणकर बंधूंनी पैसा पुरवल्याचे व लॉजिस्टिक सपोर्ट केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे.
आरोपींना शुभम लोणकर याने शस्त्र पुरवल्याचे संशय गुन्हे शाखेला आहे. प्रवीण लोणकर पुण्यातील डेअरीत बसून सिद्दिकी यांच्या हत्येबाबत बैठक घेत होता, असे तपासातून समोर आले आहे. लोणकरच्या डेअरीजवळ भंगाराच्या दुकानात काम करणारा शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप यांच्याशी प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकरची ओळख झाली. त्यांना या कटात सहभागी करुन घेतले. डेअरीमध्ये त्यांच्या बैठका झाल्या. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून लोणकर बंधूंचे नाव समोर आले. घटनेच्या महिन्याभरापूर्वी लोणकर बंधू डेअरी बंद करुन फरार झाले होते.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शुब्बू लोणकर नावाने करण्यात आली. त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतल्याचे म्हटले होते. तसेच या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख केला होता. ही पोस्ट शुब्बू लोणकर नावाने लिहिणारा शुभम लोणकर आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोटचा आहे. पुण्यात भावासोबत तो राहत होतो.
अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचल होते. मात्र शुभम लोणकर याच्या घराल कुलूप लावलेल दिसून आले आहे. त्याच्या घरी कोणीही नसल्याच पोलिसांना दिसून आले. विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई केली होती. त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि 11 जिवंत काडतूस जप्त केली होती.