पुणे | 14 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी एक भरधाव जाणाऱ्या अलिशान कारने रस्त्यावरील श्वानला उडवले होते. त्यात त्या श्वानचा मृत्यू झाला होता. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. त्यानंतर सोशल मीडियवार हा प्रकार व्हायरल झाला. या प्रकरणी कारचालकावर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात आली. आरोपीला अटक करण्याची मागणीही केली गेली. ही घटना पुण्यातील गोखले चौकात घडली होती. या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी व्हिडिओच्या मदतीने त्या कार चालकाला अटक केली. त्याची आलीशान लॅम्बोर्गिनी कार जप्त केली.
पुणे शहरातील श्वानाच्या मृत्यूप्रकरणी सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार पोलिसांनी तपास केला. त्यानंतर ती कार सराफ व्यावसायिक प्रसाद वसंत नगरकर यांची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्यावर ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चालक प्रसाद नगरकर यांना अटक करून त्यांची कारही जप्त केली.
सराफ व्यावसायिक प्रसाद वसंत नगरकर यांच्या आलीशान लॅम्बोर्गिनी कारने धडक दिल्यामुळे आठ वर्षीय श्वानचा मृत्यू झाला. कार चालकाने श्वानला धडक दिल्यानंतर कारसोबत काही दूरपर्यंत फरफटत नेल्याचे व्हिडिओतून समोर आले. या प्रकरणी नीना नरेश राय यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे शहरात अनेक जण श्वान प्रेमी आहेत. यामुळे आता पुण्यात श्वानसाठी पार्क करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने तीन एकर जागा कोंढवाजवळ दिली आहे. सुमारे १ ते ५ कोटींचा हा प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.