पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे विविध प्रकार समोर येत आहे. यामुळे सायबर गुन्हे शाखेकडे अनेक तक्रारी येत आहे. आता एका कंपनीतील ४६ वर्षीय व्यक्तीला तब्बल एक कोटी २७ लाख रुपयांमध्ये फसवण्यात आले आहे. ही फसवणूक गुंतवणुकीतून चांगले रिटर्न देण्याचे आमिष देऊन केली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ही फसवणूक केली गेली आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहरातील शिक्रापूर भागात राहणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी केलेली ही फसवणूक तब्बल १ कोटी २७ लाखांची आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून गुंतवणूक करुन चांगले रिटर्न देण्याचा हा प्रकार जून २०२२ पासून ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला आहे. फसवणूक झाल्यानंतर भोसरीत राहणाऱ्या या व्यक्तीने भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी सांगितले की, १३ जून २०२२ रोजी तक्रारदारला अनोळखी व्यक्तीकडून कॉल आला. त्यावेळी क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीची माहिती दिली. ही गुंतवणूक कशी डबल होते, हे सांगितले. त्यासाठी एक ॲप डाऊनलोड करण्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर २९ ऑगस्ट २०२२ रोजी त्यात ८३ हजारांची गुंतवणूक केली. त्यात त्याला ४९ हजाराचा नफा झाला.
तक्रारदारचा विश्वास संपादन होताच त्याला दुसरा ॲप डाऊनलोड करण्यास लावला. त्यात ५२ लाख ६४ हजाराची गुंतवणूक सहा आठवड्यांसाठी करण्यास सांगितले. परंतु सहा आठवड्यानंतर रक्कम निघत नव्हती. त्यामुळे त्याने फोन करणाऱ्या महिलेला संपर्क साधला. तिने ॲप लॉक झाले असल्याचे सांगत ६ टक्के दंड भरावा लागणार असल्याचे म्हटले. तसेच कायदा विभागाकडून काही त्रुटी आल्या असून त्यासाठी १४.४४ लाख रुपये भरावे लागणार आहे. त्यानंतर सेंटलमेंट चार्ज म्हणून ८.९९ लाख घेतले. ही सर्व रक्कम भरल्यानंतर पैसे काढता आले नाही.
तुमचे खाते बंद पडले आहे. ते सुरु करण्यासाठी १ लाख ४८ हजार रुपये भरावे लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ॲप सुरु करण्यासाठी २ लाख ७२ हजार रुपये मागितले. ॲप सुरु झाल्यावर आयकराची रक्कम ३ लाख ४८ हजार घेतली. वारंवार फसवणूक करुन १ कोटी २७ लाखांमध्ये फसवणूक केली.