सुनील थिगळे, भीमाशंकर, पुणे | 17 ऑक्टोंबर 2023 : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर निसर्गप्रेमींसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात गुरवांच्या दोन गटांत पूजेच्या अधिकाराहून जोरदार हाणामारी झाली. पोलिसांसमोर हा प्रकार सुरु होता. अखेर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. यापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये पुजाऱ्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता.
भीमाशंकर मंदिरात पुजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे भाविक दर्शनासाठी रांगेत होते. त्यावेळी दुसऱ्या गटाचा जमाव मंदिराच्या गाभाऱ्यात घुसला. यावेळी पाटावर पुजेसाठी बसलेले पुजारी विजय भिमाजी कौदरे यांना दमदाटी करून पाटावरून उठवले. त्यानंतर दमदाटी आणि शिविगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच हाताने आणि लाथा बुक्यानी मारहाण केली, अशी तक्रार गोरक्ष यशवंत कौदरे यांनी दिली. त्यावरुन एका गटाच्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शंकर कौदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. . मंदिरात पुजेच्या कारणावरुन आपणास प्लास्टिक खुर्ची आणि लोखंडी पाईप मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार शंकर कौदरे यांनी दिली.
अरे देवा, मंदिरातील गुरवांच्या दोन गटांत पुजेच्या अधिकारावरुन जोरदार हाणामारी, गुन्हा दाखल pic.twitter.com/r35SEI8E4C
— jitendra (@jitendrazavar) October 17, 2023
पुजाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर यासंदर्भात नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकाराबाबत देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांना सांगितले की, पुजेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम काही जण करत आहेत. हे सर्व लोक आमचेच आहेत. या प्रकरणावर सामोपचाराने तोडगा काढण्यात येईल.
पुजाऱ्यांमधील वादाचे हाणामारीत रुपांतर होण्याचा प्रकार यापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये घडला होता. त्यावेळी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. पुजाऱ्यांच्या गटात होणाऱ्या या वादासंदर्भात सर्वसामान्य भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.