पुणे | 5 डिसेंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाच्या तपासातून एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती उघड होत आहे. ललित पाटील याला मदत करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी तत्पर होते. ससून रुग्णालय, येरवडा कारागृह आणि पुणे पोलीस सर्व ठिकाणावर ललित पाटील याला मदत मिळाली. यामुळे तीन वर्षांतील तब्बल नऊ महिने तो येरवडा कारागृहात होता. या प्रकरणातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटील याला मदत करण्यासाठी येरवडा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने तब्बल 19 वेळा संपर्क केला. 1 ते 3 जून दरम्यान ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील, ललित पाटील याचा भागिदार अभिषेक बलकवडे आणि डॉ. संजय मरसाळे यांच्यात 19 वेळा फोनवरून संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
संजय मरसाळे यांची भूमिका महत्वाची
ललित पाटील तीन वर्षातील नऊ महिने ससून रुग्णालयात होता. त्या ठिकाणी त्याला पंचातारांकीत सुविधा मिळत होत्या. परंतु येरवडा कारागृहापासून ससून रुग्णालयापर्यंतचा प्रवासासाठी डॉ. संजय मरसाळे यांची भूमिका महत्वाची ठरली. मरसाळे हे येरवडा कारागृहातील रुग्णालयात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. एखादा कैदी आजारी पडल्यानंतर ससून रुग्णालयात पाठवण्यासाठी त्यांची शिफारस महत्वाची असते. त्याशिवाय कैदी ससूनमध्ये जात नाही. डॉ. मरसाळे यांनी ड्रग्जतस्कर ललित पाटील याच्यावर कारागृहात उपचार शक्य असताना त्याची शिफारस केली. यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
येरवडा कारागृहातून ललित पाटील याला ३ जून रोजी ससून रुग्णालयात हलवले. त्यावेळी १ ते ३ जून दरम्यान भूषण पाटील, अभिषेकी बलकवडे आणि डॉ. संजय मरसाळे यांच्यामध्ये तब्बल १९ वेळा फोनवरून संपर्क झाला. तसेच कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांनी अभिषेक बलकवडे याच्याकडून पैसे घेतले होते. त्यातील यातील २० हजार डॉक्टर संजय मरसाळे यांना दिले. ललित पाटील याला ससूनला पाठवण्यापूर्वी डॉक्टर मरसाळे यांनी सलग दोन दिवस भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्याशी संपर्क साधल्याचे तपासातून उघड झाल्याचे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.