पुणे : ड्युप्लिकेट सीएम म्हणून (Duplicate Shinde) अवघ्या काही दिवसांतच विजय माने (Vijay Mane) व्हायरल झाले. सोशल मीडियामध्ये त्यांचे फोटो, व्हिडीओ ट्रेन्ड होऊ लागले. त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा (Pune Crime News) दाखल झाल्यानं आता नवा वाद छेडला गेलाय. याप्रकरणी अखेर विजय माने यांचदेखील स्पष्टीकरण समोर आलं आहे. मला माहीत नसताना माझे नकळत फोटो काढले गेले, कोणत्याही प्रकरणाची शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असं विजय माने यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतीमा मलीन केली, असा आरोप विजय माने यांच्यावर करण्यात आला आहे. याच आरोपाखाली त्यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. पोलिसांनी केलेले आरोप विजय माने यांनी मात्र फेटाळून लावलेत.
मी वेळोवेळी पोलिसांनी सहकार्य केलं आहे. मुख्यमंत्री साहेबांना आणि माध्यमांना मी वेळोवेळी सांगितलं, की मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतीमा मलीन होईल, असं कोणतही कृत्य मी केलेलं नाही आणि करणारही नाही. गैरवापर करुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचं विजय माने यांनी म्हटलंय.
विजय माने हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचे ड्युप्लिकेट म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये त्यांनी आपण इंजिनिअर एमबीए असल्याचं म्हटलंय. शिवाय भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सरचिटणीसही आहेत. पुण्यातील हवेली येथील ते रहिवासी असून आपण समाजसेवक आहोत, असंही ते म्हणाले आहेत.
नुकतीच विजय माने आणि एकनाथ शिंदे यांची भेटही झाली होती. त्यानंतर आता विजय माने यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत विजय माने यांच्यावरही आरोपांवरुन पोलिसांवर निशाणा साधलाय. विजय नंदकुमार माने हा एकनाथ शिंदे यांच्या सारखा दिसतो यामध्ये त्याचा काहीही दोष नाही, असं सरोदे यांनी म्हटलंय.
विजय नंदकुमार माने याच्यावर पुणे शहर गुन्हे शाखेने कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) असे गुन्हे लावले आहेत.
प्रथमदर्शनी विजय माने यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे वाटत आहेत, आम्ही याची माहिती घेणार आहोत, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. विजय माने याच्याविरुद्ध कारवाई प्रथमदर्शनी अत्यंत उत्साहाच्या भरात केलेली, चुकीची व बेकायदेशीर आहे, असं म्हणत त्यांना कायदेशीर मदतीची तयारीही दाखवलीय.