देवा राखुंडे, पुणे | 7 नोव्हेंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत अजित पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील ३२ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. दोन जागा भाजपच्या वाटेला गेल्या. या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार गटाचे अस्तित्व बारामती तालुक्यात दिसले नाही. एकीकडे या निकालाचा जल्लोष सुरु असताना निकालानंतर हाणामारी अन् गोळीबाराच्या घटना घडल्या. इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये निवडणुकीत पराभूत झाल्याने हवेत गोळीबार केला गेला. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील काझड गावात गोळीबार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुल चांगदेव नरुटे आणि समीर नरुटे यांनी शिवीगाळ करून हवेत गोळीबार केला. प्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात वाद झाला. याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांत 80 ते 90 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक निकालाच्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी यांनी जमाव बंदी, शस्त्रबंदीचे आदेश काढले होते. परंतु सायंबाचीवाडी गावात सार्वजनीक ठिकाणी बेकायदेशिररित्या गर्दी जमवून हाणामारी, दंगा करुन शांतता भंग केली.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी 143,147,148,149,160, 188 ,324,323,427, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 चे कलम 37(1)/135 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपी दुर्योधन भापकर याच्यावर सायंबाचीवाडी येथील पोलीस पाटील यांनी देखील गुन्हा नोंद केला आहे. दुर्योधन भापकर याने पोलीस पाटील यांना मारहाण केल्याचा पोलीस पाटलांचा आरोप आहे.