योगेश बोरसे, पुणे | 2 नोव्हेंबर 2023 : विदेशी मद्याची तस्करीचे प्रकरणे राज्यात अधूनमधून उघड होत असतात. आता पुणे शहरांत विदेशी मद्याच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघड झाले आहे. मद्य तस्कर जनावरांच्या खाद्यासोबत विदेशी मद्याची तस्करी करत होते. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबई बंगलोर महामार्गावर रावेत या ठिकाणी सापळा रचून हा मद्य साठा जप्त करण्यात आला. हे मद्यगोवामध्ये तयार केले गेले होते. तसेच ते मुंबईकडे घेऊन जात होते. उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत सर्व साठा जप्त केला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली.
बेंगळुरू-मुंबई महामार्गावर विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रावेत गावच्या हद्दीत सापळा रचला. पथकाने महामार्गावरुन जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरु केली. एक १४ चाकी वाहन जात असताना त्याला अडवले. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात जनावराचे खाद्य असलेली पोती होती. या पोत्यांमध्ये काय आहे? अशी विचारणा केली असताना आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर पथकाने स्वत: तपासणी केल्यावर विदेशी मद्याची खोकी आढळून आली.
मुंबई, बंगलोर महामार्गावर विदेशी मद्य असणाऱ्या १२५७ बॉक्स त्या ट्रकमध्ये सापडले. एकूण ४० हजारांपेक्षा जास्त मद्याच्या बाटल्या त्यात होत्या. त्याची किंमत साधरण १ कोटी १९ लाख रुपये आहे. हा सर्व साठा वसई, विरारला जाणार आहे. या प्रकरणामध्ये विजय चंद्रकांत चव्हाण (वय ५३, रा. सातारा) आणि सचिन निवास धोत्रे (वय ३१ रा. सांगली) या आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.