पुणे | 2 ऑगस्ट 2023 : पुण्यात हिंदूराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय देसाई याच्या सांगण्यावरून त्याच्या समर्थक मुलांनी त्याला जमीन लिहून देण्यासाठी एका शेतकरी तरुणावर दबाव टाकला, तसेच तरुणावर जीवघेणा हल्ला केला करण्यात आला. तरुणाला पिस्तूलाचा धाक दाखवून त्याच्यावर धारधार हत्याराने वार करण्यात आले, असा आरोप करण्यात येतोय. दरम्यान, या हल्यात पीडित तरूण गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह आणखी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी धनंजय उर्फ भाई जयराम देसाई (वय 45), रोहित संजय काकतकर (वय 29), श्याम विलास सावंत (वय 29), निखील आनंद आचरेकर (वय 38), सुरज रमेश मेहरा (वय 23), कुणाल आनंद निकम (वय 22, सर्व रा. परमाल बंगला, विठ्ठलवाडी, पौड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी आहेत. त्यांच्या शेजारीच धनंजय देसाई याची जमीन आहे. गेल्या काही दिवसांपासून देसाईकडून त्यांना जमीन देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होते. मंगळवारी सायंकाळी 10 ते 15 जणांनी फिर्यादीला पिस्तूल दाखवून धमकावले. तर इतरांनी तलवार, लोखंडी रॉड, काठ्यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पौड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून धनंजय देसाईसह सहा जणांना अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह त्याच्या साथीदारांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने देसाई याच्यासह अटकेत असलेल्या सहाही जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.