पुणे शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कोयता गँग, रस्त्यांवर होणारे हल्ले यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पुण्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. त्या गुन्हेगारांना वर्दीची भीतीच वाटत नाही. यामुळे छोट्या छोट्या कारणावरुन मारहाण आणि हल्ला करण्याच्या घटना घडत आहे. आता पुण्यात एका हॉटेल चालकास दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील खराडी भागत रात्री दीड वाजता हा प्रकार घडला आहे. हॉटेल बंद करुन हॉटेल मालक जात होतो. परंतु चौघांनी पिझ्झाची मागणी केली. त्यांना पिझ्झा दिला नाही. यामुळे त्यांनी दगडाने मारहाण केली.
पुणे येथील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव गेले. त्यांनी त्या ठिकाणी पिझ्झा देण्याची मागणी केली. परंतु हॉटेलचा मालक हॉटेल बंद करुन निघाला होता. त्यानंतर हे चौघांनी मागणी लावून धरली. परंतु हॉटेल मालकाने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला मारहाण केली. हॉटेलचालकाला दगडाने मारहाण केल्यामुळे तो जखमी झाला. या प्रकरणी चौघं आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात धक्कादायक घटना घडली होती. उंड्री भागात मिलेनियम लेबर कॅम्पमध्ये जेवणाची चव बिघडल्यामुळे संतापलेल्या तरुणाने हातोडा मारून आचाऱ्याचा खून केला होता. शुभम शास्त्री सरकार (वय-६३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव होते. या प्रकरणात आरोपी कमल नारायण मार्डी (वय ४९, रा. जियापुर, पश्चिम बंगाल) याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला होता. त्यानंतर हॉटेलमध्ये पिझ्झा मिळाला नाही म्हणून मारहाणीचा प्रकार घडला आहे.
पुणे शहरात वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय बनत चालली आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात किरकोळ कारणावरुन हल्ल्यांचे प्रकार होत असल्यामुळे पुणेकर भयभीत झाले आहेत.