पुणे, नाशिक | 16 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेले ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार झाल्यानंतर ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. त्यानंतर पुणे पोलीस चांगलेच आक्रमक झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर सोमवारी धडक कारवाई झाली. पुणे ते नाशिक धाडसत्र राबवले गेले. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले आहेत. तसेच या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता दहा झाली आहे.
ड्रग्ज प्रकरणातील मास्टर माईंड ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन अटक केली होती. या प्रकरणात अभिषेक बलकवडे यालाही अटक झाली होती. यानंतर आता पोलिसांनी भूषण आणि अभिषेक या दोघांची कसून चौकशी सुरु केली आहे. त्याचवेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी केली जात आहे. त्यासाठी पुणे पोलिसांचे पथक नाशिकला आले आहे. नाशिक पोलिसांना सोबत घेऊन ही चौकशी सुरू आहे.
पोलिसांना या चौकशीत अनेक महत्वाची दुवे मिळाले आहेत. अभिषेक बलकवडे हा नाशिकमधील टाकळी रोड भागात राहतो. याठिकाणी त्याची आई, पत्नी आणि 10 महिन्यांची मुलगीही राहते. त्याच्या घराची तपासणी केल्यानंतर ललित पाटील याच्या पाटील ऍग्रो कंपनीचे कागदपत्रे पोलिसांना मिळाली. 2016 पासून अभिषेक हा ललित पाटील याच्या संपर्कात आल्याचे त्याच्या कुटुंबियांनी चौकशीत सांगितले.
ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला घेऊन पुणे पोलीस नाशिकला आले. पोलिसांनी भूषणला ड्रग्स कारखान्यात तपासासाठी नेले. तसेच त्याच्याशी संबंधित इतर ठिकाणी पोलीस गेले. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटील याला घेऊन परत पुण्याला रवाना झाले.
ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी सोमवारी मोठी कारवाई केली. नाशिक-मुंबई-पुणे पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईत आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे. नाशिकमध्ये तयार होणाऱ्या ड्रग्सची विक्री नाशिक बाहेर होत होती, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ललित पाटील प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून सीआयडीकडे द्या, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. या प्रकरणास १४ दिवस उलटूनही पुणे पोलिसांच्या तपासात प्रगती नाही. यामुळे तपास सीआयडीकडे द्या, असे त्यांनी म्हटले आहे.