पुणे, दि. 9 जानेवारी 2024 | पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपासाला वेग आला आहे. हा तपास अधिक वेगाने करण्यासाठी आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात येणार आहे. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाच्या सखोल तपास करण्यात येणार आहे. यावेळी पुणे पोलिसांनी न्यायालयात या खून प्रकरणाची महत्वाची माहिती दिली. या खून प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही वकील दीड तास आरोपींबरोबर होते. त्यांनी एकत्र प्रवास केला. आरोपींना दोन्ही वकील खेड शिवापूर टोलनाक्यावर जाऊन भेटले. वकिलांचा आरोपी शरण येण्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात खोडला. आरोपींना पोलिसांकडे शरण यायचे होते, मग त्यांनी सिम कार्ड का बदलेले ? असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही वकिलांनाही ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
न्यायालयात कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शरद मोहोळ खून प्रकरणाची महत्वाची माहिती दिली. सर्व सहा आरोपी १५ डिसेंबर २०२३ रोजी भेटले होते. या भेटीनंतर त्यांनी वकील रवींद्र पवार याला फोन केला होता. तसेच ५ जानेवारी रोजी खून केल्यानंतर साहिल पोळेकर आणि इतर आरोपी सातारा रस्त्याने पळून गेले. त्यानंतर या आरोपींना वकील रवींद्र पवार आणि वकील संजय उडान खेड शिवापूर टोलनाक्यावर जाऊन भेटले. पवार आणि उडान यांनी आरोपींसोबत दीड तास प्रवास केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींसमवेत वकिलांना ताब्यात घेतले.
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांना शरण यायचे होते, असा दावा ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांनी केला होता. त्यावर पोलिसांनी आरोपींना शरण येयाचे होते तर त्यांनी सिम कार्ड का बदलेले ? पुण्याच्या दिशेने न येता विरुद्ध दिशेने का प्रवास केला ? दोन्ही वकील आरोपींना कुठे घेऊन जाणार होते? असे उपस्थित केले. या प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. यावेळी आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्यास विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वकिलांच्या पोलिस कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढवली.