लोणावळा : 2 वर्षांच्या चिमुरडीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. लोणावळ्यातील एका खासगी बंगल्यात ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. ही मुलगी मूळची डोंबिवली येथील होती. ती आपल्या वडिलांसोबत आणि अन्य नातलगांसोबत लोणावळा इथं आली होती. कुटुंबीयांसोबत वेळ घालण्यासाठी आलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त होतेय. तर या दोन वर्षीय मुलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.
लोणावळा येथे असलेल्या कार्निवल विला बंगल्यात ही घटना घडली. सकाळी साधारण 9-9.15 वाजण्याच्या सुमारास ही दोन वर्षांची चिमुकली कुटुंबीयांसोबत बंगल्याच्या आवारत होती. यावेळी चिमुकलीचे वडील इतर नातलगांसोबत नाश्ता करत होते.
दरम्यान, सगळ्यांचा डोळा चुकवून ही मुलगी स्विमिंग पूलजवळ गेली. तिथे गेली असता ही मुलगी अचानक पाण्यात पडली. काही वेळानंतर ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यानं सगळे स्विमिंग पूलच्या दिशेने धावले. त्यावेळी दोन वर्षांचा कोवळा जीव स्विमिंग पूलमध्ये पडल्याचं दिसून आलं.
या मुलीला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण तिथे डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केलं. ही बाब कळल्यानंतर या मुलीच्या वडिलांना मोठा धक्काच बसला. या मुलीचं नाव हानीयाझैरा सैयद असं आहे. तर तिच्या वडिलांचं नाव मोहम्मद नदीम कैसर हुसैन सय्यद असं आहे.
लोणावळ्यात गेल्या काही महिन्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. याआधी नाशिकचं एक कुटुंब लोणावळ्यात पर्यटनासाठी एका बंगल्यात आलं होतं. त्यांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. या बंगल्यातील स्विमिंग पूलमध्ये पडून एका 13 वर्षांच्या मुलाचा जुलै महिन्यात मृत्यू झाला होता.
त्यानंतर आता डोंबिवली येथील दोन वर्षीय मुलीचाही स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनांचा लोणावळ्यातील पर्यटनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या घटना रोखण्यासाठी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणं, त्यांच्यासोबत राहणं, सतर्कता बाळगणं, या गोष्टी करण्याची नितांत गरज व्यक्त केली जातेय.
आता दोन वर्षांच्या झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणा लोणावळा पोलिसांनी अपघातीच मृत्यूची नोंद केली आहे. या मुलीला संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केल्याचं पोलिसांनी म्हटलंय.