पुणे : पुणे जिल्ह्यातील देहू रोड भागातील मुंबई-बंगळुरु महामार्गावर राजेरोसपणे देहव्यापार सुरु असल्याचं समोर आलंय. येथील द्वारका रुम्स लॉजमधील एकूण दहा महिलांना मुक्त करण्यात आलं असून त्यांना देहव्यापारत ढकलण्यात आलं होतं. या महिलांकडून अशा प्रकारचे काम करुन घेणारा लॉजचा मॅनेजर गविरंगा गौडा याला पोलिसांनी अटक केलं आहे. तर दुसरा आरोपी पोलिसांनी छापा टाकताच पळून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील देहू रोड या भागात मुंबई-बंगळुरु महामार्गावर द्वारका लॉजवर महिलांकडून देहव्यापार करुन घेतला जात होता. मागील अनेक दिवसांपासून हे सुरु होते. याची गुप्त माहिती पिंपरी-चिंचवड येथील पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सेक्युरिटी सेलची एक विशेष टीम तयार केली. या टीममध्ये तीन अधिकारी आणि 12 इतर पोलिसांचा समावेश होता. या मध्ये एका महिला पोलिसाचादेखील समावेश करण्यात आला होता. या पथकाने द्वारका लॉजवर छापेमारी करुन देहव्यापार करणाऱ्या महिलांना मुक्त केलं. तसेच लॉजच्या मॅनेजरला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी या कारवाईत एकूण दहा महिलांना रेस्क्यू केलं आहे. यातील चार महिला या पश्चिम बंगाल, तीन महाराष्ट्र, दोन कर्नाटक तर एक महिला आसाम राज्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार लॉजचा मॅनेजर या महिलांकडून त्यांच्या इच्छेविरोधात देहव्यापार करुन घेत होता. पोलिसांनी या महिलांना रेस्क्यू फाऊंडेशन नावाच्या खासगी संस्थेकडे सोपवले असून ही संस्था महिलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवणार आहे.
दरम्यान, या धाडसत्रामध्ये पोलिसांनी लॉजमधून दोन मोबाईल फोन, 25 हजार 700 रुपये जप्त केले आहेत. तर एक आरोपी पळून जाण्यास यशस्वी ठरला असून त्याचा शोध घेणे सुरु आहे.
इतर बातम्या :