पिंपरी चिंचवड : कोयत्याचा धाक दाखवत लोखंडी पाईपने मारहाण करुन पादचाऱ्यांचे मोबाईल लुटणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहत परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहतीमधील जंबुकर वस्तीमधून पायी जाणाऱ्या व्यक्तींची लूट करण्यात आल्याचा आरोप आहे. कोयत्याचा धाक दाखवत लोखंडी पाईपने मारहाण करुन तिघा आरोपींनी पादचाऱ्यांचे मोबाईल लुटले होते. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
कोणाकोणाला अटक?
आरोपी सुरज रोकडे, प्रतीक आढाव आणि त्यांच्या सोबत असलेल्या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. चोरी केलेला हा मोबाईल नाणेकरवाडी येथील प्रतीक मोरे याला विकला असल्याचं त्यांनी कबूल केलं. त्यानंतर चोरीचा मोबाईल घेणारा आरोपी प्रतीक मोरे याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईत वॉचमनची घरफोडी
दुसरीकडे, 25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करून नवी मुंबईतील एनआरआय कोस्टल पोलिसांनी मोठ्या घरफोडी प्रकरणाचा शोध लावला आहे. आतापर्यंत 21 लाख रुपयांहून अधिक किमतीचा चोरीचा माल आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. हे दोघे नेपाळमध्ये जाणार होते त्याआधी पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिस उपायुक्त (झोन 1) विवेक पानसरे यांनी सांगितले, की सुमारे एक आठवड्यापूर्वी सीवूड्स सेक्टर 44 मधील बालकृष्ण हाऊसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये चार सुरक्षा रक्षकांनी घरफोडीची योजना आखली होती. तिथे राहणारे जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. नंदलाल जैन यांच्या घरी डिलिव्हरी बॉय म्हणून गेलेले आरोपी नवीन रतन विश्वकर्मा आणि कामी भक्ता गोरे हे मूळ नेपाळ येथील रहिवाशी आहेत.
25 लाख 19 हजारांचा मुद्देमाल चोरीला
फिर्यादी संदीप जैन यांच्या तक्ररीवरून 24 तासात पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी रोख रक्कम आणि सोने-चांदी अशा एकूण 25 लाख 19 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी 22 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढला
अधिक चौकशीतून आरोपीविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीने घरफोडी करण्याआधी आणि ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही फूटेजचा डीव्हीआरही काढून घेतले आणि नंतर घरफोडी केली.
दहिसर-पुण्यातून आरोपी अटकेत
डीसीपी (झोन 1) यांच्या मार्गदर्शनाखाली, एसीपी (तुर्भे) गजानन राठोड आणि एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पोलीस पथकाने विविध मार्गांवर काम करून अखेर दोन आरोपी सुरक्षा रक्षकांना दहिसर आणि पुणे येथून अटक केली. नवीन विश्वकर्मा (31) आणि कामी बी गोरे (36) अशी त्यांची नावे आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेर जाणार असल्याची पूर्व माहिती होती आणि त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरात घुसण्याचा कट रचला गेला. इतर दोन हव्या असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या :
दारुच्या नशेत 32 वर्षीय तरुणाची पित्याला बेदम मारहाण, औरंगाबादेत वृद्धाचा मृत्यू
सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा
नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या