पिंपरी चिंचवड : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेल्या या गैर प्रकारातून चार महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा सेंटर मालक महिला आणि मॅनेजर रनवीर रामनरेश राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारुन कारवाई केली. कस्पटे वस्ती वाकड येथे ‘ट्रॅको ट्रीट स्पा’ नावाचे स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये आरोपींनी चार महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी ठेवले होते.
महिलांना पैशांचे अमिष दाखवून आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचा आरोप आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. चार महिलांची सुटका करुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरीत याआधीही स्पा सेंटरमध्ये देह व्यापार
याआधीही पुण्यामध्ये वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींची सुटका करण्यात आली होती. तर त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली होती. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींना आणि त्यांच्याकडून व्यवसाय करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चौघी तरुणींची सुटका केली. तर स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली होती.
पिंपरीतील बार आणि लॉजवर छापेमारी
याआधी, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली होती. जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी 200 हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं होतं.
लॉज-बारमध्ये काय सुरु होतं?
कोव्हिडसंबंधी नियमांचे उल्लंघन करुन अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि 18 डिग्री रुफ टॉप बार सुरु होते. दारु पिऊन आणि इतर मादक पदार्थांचं सेवन करुन तरुण-तरुणी वीकेण्ड पार्टी साजरी करत होते. अॅलो गॅस्ट्रो लॉजमधून 113, तर एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारमधून 105 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
पिंपरीतील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चौघींची सुटका, स्पा चालक अटकेत
पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका
नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले