पिंपरी चिंचवड : जात पंचायतीने समाजातून बाहेर काढत वाळीत टाकल्या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम सागरे यांनी जात पंचायती विरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. जात पंचायतीकडून घटस्फोट का घेतला नाही, असा सवाल विचारत सागरे कुटुंबाला जात पंचायतीने वाळीत टाकल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार सीताराम सागरे याचे पत्नीशी कौटुंबिक वाद होते, त्यामुळे त्याने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु घटस्फोट जात पंचायतीकडून का घेतला नाही म्हणून जात पंचायतीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत केले.
14 जणांविरोधात पोलिसात तक्रार
सीताराम सागरे यांनी केरप्पा मारुती वाघमारे, बाजीराव केरप्पा वाघमारे, साहेबराव केरप्पा वाघमारे आणि बाळकृष्ण केरप्पा वाघमारे यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवडमध्येही जात पंचायतीच्या निर्णयाची तक्रार
दरम्यान, पुण्याच्या सासवडमध्येही एक विचित्र प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. जात पंचायतीच्या निर्णयानुसार एका कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं होतं. या विरोधात संबंधित 34 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्याबद्दलही महिलेने सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीनुसार अखेर आरोपी रुपेश कुंभार, निखिल कुंभार यांच्याशिवाय आणखी तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमकं काय घडलं होतं?
पोलीस तक्रारीत आमचं नाव का टाकलं? असा जाब विचारात आरोपींनी धिंगाणा घातला होती. यावेळी त्यांनी महिलेला प्रचंड मारहाण केली होती. महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. हा सर्व घडणारा प्रकार धडकी भरवणारा असा होता. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी फिर्यादी महिलेसह तिचे पती, बहीण आणि आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, या घटनेची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली होती. अंनिसच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. पोलीस ठाण्यात गुन्ह्यात नाव आसल्यामुळे आरोपींनी महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत नोंद आहे. त्याचाच राग मनात धरुन आरोपींनी महिलेला मारहाण केली, अशी माहिती अंनिसच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी दिली होती.
संबंधित बातम्या :
जात पंचायतीकडून कुटुंबावर बहिष्कार, महिलेची पोलिसात तक्रार, आरोपींची लाथाबुक्क्यांनी मारहाण
घरजावई होण्यास नकार दिल्यामुळे पूर्ण कुटुंबावर बहिष्कार, जात पंचायतीच्या 6 जणांना अटक
MPSC करणाऱ्या तरुणीचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा, बहिष्कार टाकणाऱ्या जात पंचायतीला 7 बहिणींची चपराक