पिंपरी चिंचवड : क्षुल्लक कारणावरुन वाद झालेल्या तरुणाचा ‘गेम’ वाजवण्यासाठी पिस्तूल खरेदी करायची, म्हणून तरुणाने चक्क एटीएम फोडल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. एटीएममध्ये झालेल्या तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
विशाल दत्तू कांबळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील आठवड्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन विशाल कांबळेचे एका मुलासोबत भांडण झाले होते. एटीएम फोडून पैसे मिळवू, त्यातून पिस्तूल खरेदी करु आणि त्या तरुणाचा गेम वाजवू, असा प्लॅन तरुणाने केला होता.
बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
आपल्या योजनेनुसार विशालने नवी सांगवी येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला एटीएम पूर्णपणे फोडता आले नाही. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने या तरुणाला अटक केली आहे. एटीएममध्ये तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दहशत पसरवणारा आरोपीही जेरबंद
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या खेड आणि मंचर भागात गोळीबार करुन दहशत पसरवणाऱ्या खुनातील फरार कुख्यात आरोपीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सुधीर थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर मंचर, खेड पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.
पुण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न
पुणे जिल्ह्यात चाकण औद्योगिक वसाहत परिसरात भांबोली फाटा येथे चोरीच्या उद्देशाने हिताची बँकेच्या एटीएममध्ये स्फोट घडवून आणल्याचा प्रकार गेल्याच महिन्यात समोर आला होता. स्फोटात ATM सह समोरील काचांचा चक्काचूर झाला. सुदैवाने या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती.
एकमेकांना पाहून खुन्नस, नागपुरात गोळीबार
दुसरीकडे, एकमेकांकडे बघून खुन्नस दिल्याच्या रागातून समोरच्या टोळीतील गुंडाला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याचं नागपुरात नुकतंच समोर आलं होतं. गीतांजली टॉकीज चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
संबंधित बातम्या :
पुण्यात हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट, चोरीच्या उद्देशाने एटीएम उडवल्याचा संशय
एकमेकांकडे पाहून खुन्नस दिल्याचा राग, नागपुरातील गोळीबार प्रकरणात दोघांना अटक