बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून, विषप्राशन केलेल्या पुण्यातील पतीचाही अखेरचा श्वास

| Updated on: Nov 21, 2021 | 8:03 AM

बहिणीच्या आत्महत्येची माहिती मिळताच भाऊ समीर आणि त्याची पत्नी वैशाली यांच्यामध्ये सकाळी मोठा वाद झाला. बहिणीने आपल्या बायकोच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा राग डोक्यात घेऊन पती समीरने पत्नी वैशालीवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली.

बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून, विषप्राशन केलेल्या पुण्यातील पतीचाही अखेरचा श्वास
मयत पती समीर तावरे
Follow us on

पुणे : बहिणीच्या आत्महत्येनंतर व्यथित झालेल्या भावाने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात समोर आली होती. बायकोची हत्या केल्यानंतर पतीनेही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. विष प्राशन केलेल्या समीर तावरे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र या दरम्यान त्याचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

पती समीर तावरे (वय 42 वर्षे), पत्नी वैशाली तावरे (वय 30 वर्षे) आणि बहीण माया सातव (वय 35 वर्षे) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघा जणांची नावे आहेत. समीर तावरे हे शेतकरी कुटुंबातील असून शेती करुन उदरनिर्वाह करत होते. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हे कुटुंब वास्तव्यास होते.

कौटुंबिक वादानंतर बहिणीची आत्महत्या

माया सातव हिचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता, मात्र तिचा पती तिला नांदवत नसल्याने ती माहेरी भावाकडे राहत होती. परंतु ती माहेरी राहत असल्याने नणंद-भावजय यांच्यामध्ये कायम वाद होत होते. पती समीर, पत्नी वैशाली आणि बहीण माया यांच्यात 17 नोव्हेंबरच्या रात्री कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला. या वादानंतर बहीण माया सातव हिने घराजवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

पत्नीची हत्या करुन पतीचे विषप्राशन

बहिणीच्या आत्महत्येची माहिती मिळताच भाऊ समीर आणि त्याची पत्नी वैशाली यांच्यामध्ये सकाळी मोठा वाद झाला. बहिणीने आपल्या बायकोच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा राग डोक्यात घेऊन पती समीरने पत्नी वैशालीवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः विष प्राशन करुन विहिरीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

समीर आणि वैशाली यांना दोन मुले आहेत. ही मुले शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना आई वैशाली ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली.

समीरला दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीपासूनच त्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र काल उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेचा अधिक तपास आता शिरूर पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

बहिणीची आत्महत्या, भावाने पत्नीची हत्या करुन विष प्राशन केले; वाचा नेमकं असं काय घडलं?

बहिणीकडून ओवाळणीनंतर निघालेल्या दादाला अपघात, रात्रभर नाल्यात पडून, सकाळी मृत्यू

पूजा कावळे हत्याकांड: पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात